अहमदनगर : अज्ञात कारणावरुन भरदिवसा एका तरुणाची लाठ्या, काठ्यांनी मारहाण करीत आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे घडली आहे. राजा भोसले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीचा मोठा प्रश्न उपस्थित झाला असून पोलीस ही गुन्हेगारी कशी रोखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजा भोसले हा कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावातील रहिवासी आहे. कोपरगाव येथील आठवडे बाजारात राजा आला होता. यावेळी अचानक आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. लाठ्या, काठ्या, लोखंडी गजाने राजाला मारहाण केली. एवढ्यावरच हे टोळके थांबले नाही, त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा झालेल्या या घटनेने कोपरगाव तालुका हादरला आहे.
टोळक्याने केलेल्या मारहाणीत राजा हा गंभीर जखमी झाला होता. राजाला गंभीर जखमी करीत टोळक्याने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेल्या राजा भोसले यास नागरिकांनी तात्काळ जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. राजाचे नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये जमा झाले होते. त्यातील काही संतप्त लोकांनी हॉस्पिटलच्या काचा फोडल्या आणि रुग्णवाहिकेची देखील तोडफोड केली.
ही हत्येची घटना नेमक्या कोणत्या कारणाने घडली आणि कोणी घडवली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. हत्येनंतर सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हत्येचे कारण हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान आरोपींना अटक करण्याची मागणी करीत संतप्त जमावाने काही वेळ कोपरगाव शहरात रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी जमावाला आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव पांगला. (Young man beaten to death in Ahmednagar’s Kopargaon taluka)
इतर बातम्या
नागपूर: कॅनलमध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह; चार दिवसांपासून होता घरातून बेपत्ता, घातपाताचा संशय
Sameer Wankhede: समीर वानखेडे यांची डीआरआय विभागात बदली, एनसीबीतील कार्यकाळात अनेक मोठ्या कारवाया