पालघर : एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यात उघडकीस आली. आई-वडील आणि तरुण मुलाचा कोव्हिड संसर्गानंतर मृत्यू झाला. सुदैवाने सून आणि नातवंडं कोरोनावर मात करुन घरी परतली. मात्र पतीसह सासू-सासऱ्यांचं छत्र हरपल्याने महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Palghar Family Son Mother Father Dies of Corona)
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात ऐनशेत गावात ही घटना घडली. ठाकरे कुटुंबातील आई-वडील, त्यांचा 34 वर्षीय मुलगा, सून आणि नातवंड एकामागून एक कोराना बाधित झाले होते. सर्वांवर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते.
आई सविता ठाकरे यांचा 11 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यानंतर 34 वर्षीय मुलगा सागर ठाकरे याने 22 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. तर मृत्यूशी झुंज देत असताना 1 मे रोजी वडील सदानंद ठाकरे यांनीही प्राण सोडले. संपूर्ण कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे ऐनशेत गावावर शोककळा पसरली आहे.
उस्मानाबादेत पत्रकार भावांचा मृत्यू
कोरोनाच्या संकटकाळात एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांवर काळाने घाला घालण्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. उस्मानाबाद येथील बेदमुथा कुटुंबातील दोघा भावांचा अवघ्या 8 दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना संसर्गानंतर हैद्राबादमध्ये उपचारादरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली. दोघंही भाऊ पेशाने पत्रकार होते.
पुण्यात कोरोनाने कुटुंब संपवलं
कोरोनाने पुण्यात अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं. पूजेनंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर एकामागोमाग एक अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे जाधव कुटुंबच संपलं.
संबंधित बातम्या :
कोरोनाने कुटुंबाचे दोन आधारस्तंभ निखळले, उस्मानाबादेत पत्रकार भावांचा मृत्यू
पूजेनिमित्त एकत्र येणारं जाधव कुटुंब 15 दिवसात कोरोनाने संपवलं, पुणेकरांनो सावध व्हा
(Palghar Family Son Mother Father Dies of Corona)