पालघर रेल्वे स्थानकाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. पालघरच्या हनुमान मंदिर चौक येथील बंद रेल्वे फाटक ओलांडताना रेल्वेखाली आल्याने हा अपघात झाल्याचे माहिती समोर येत आहे. यानंतर आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मुंबई सेंट्रलहून जयपूरला जाणारी गाडी क्रमांक 12955 ही एक्सप्रेस रात्री 8.30 च्या दरम्यान पालघर स्थानकातून निघाली. यावेळी हनुमान चौकाच्या महावितरण कार्यालयातून सा. बां. विभाग विश्रामगृहाकडे जाणाऱ्या मार्गावरुन तीन जण रेल्वे फाटक ओलांडत होते. यावेळी मुंबईहून जयपूरकडे जाणारी जयपूर एक्सप्रेस आली. तर दुसऱ्या रुळावरुनही एक भरधाव गाडी आली. यावेळी त्या तिघांपैकी दोघेजण दोन रुळाच्या मध्ये उभे होते. मात्र त्यांना एका गाडीचा धक्का लागला आणि त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या तिघांपैकी एक तरुण लघुशंखेसाठी गेल्याने तो या अपघातात जखमी झाला.
या अपघातात मृत्यू झालेले दोघे जण बोईसरमध्ये कामाला होते. बोईसर पूर्वेला एका उद्योगात वेल्डिंग आणि इतर काम हे करत होते. हे तिघेही बिहार राज्यातील मोतीयारी जिल्ह्यातील आहे. हे तीन तरुण सुट्टीनिमित गृहपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालघर शहरात आले होते. मात्र फाटक ओलांडून जाण्याच्या त्यांच्या निर्णयाने त्यांचा घात झाला. या घटनेत सोनू राम (35) आणि मोनू कुमार (19) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनुप पंडित (20) जखमी झाला आहे. सध्या जखमीवर पालघर मधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर रेल्वेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सध्या या ठिकाणी मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून पालघर रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे. पण तरीही पर्यायी मार्ग नसल्याने दररोज शेकडो लोक रेल्वे फाटक ओलांडून पूर्व पश्चिम प्रवास करत आहेत. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचे बोललं जात आहे.