रवी लव्हेकर आणि सागर सुरवसे, प्रतिनिधी, पंढरपूर | 23 नोव्हेंबर 2023 : आज कार्तिकी एकादशी आहे. त्यानिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याचा मान मिळाला. पहाटे 2:20 मिनिटांनी ही पूजा सुरु झाली. 3:25 मिनिटांनी ही पूजा समाप्त झाली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
विठुरायाच्या चरणी प्रार्थना आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी सुखी व्हावा. आज शेतीवर संकट आहे. अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. महाराष्ट्रात मराठा, धनगर यसह आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत . या सर्वांच्या मागण्या पूर्ण करण्याची ताकद द्यावी, असं साकडं देवेंद्र फडणवीस यांनी विठूरायाकडे घातलं.
विठू माऊली चरणी प्रार्थना करतो की सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. समाजातील तेढ दूर करायचे असेल आपल्याला वारकरी व्हावे लागेल.आपल्याला महाराष्ट्र धर्म जागृत ठेवयाचा असले तर एकमेकांचे प्रश्न समजून घ्यावे. अनेक वर्षानुवर्षे गावगाड्यात एकत्र राहतात त्यांनी एकमेकासमोर येऊ नये. आपल्या मागण्या जरूर कराव्यात पण इतरांना विरोध करू नये, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतो. अनेक आक्रमक देशावर, धर्मावर, मंदिरावर आस्थेवर हल्ले झाले. मात्र भागवत धर्माची पताका कधीही थांबली नाही. कोणताही क्रूरकर्मा आमची पताका रोखू शकला नाही. संतांच्या मंदियाळीने सामान्य माणसाला जगण्याचा आधार दिला. पिढ्या, माणसं बदलली पण श्रद्धा बदलली नाही. जी संकल्पना मागील कार्तिकीला मांडली होती ती म्हणजे मंदिर पुनर्निर्माणाची… पंढरपूर विकास आराखड्याबाबत आपल्याला सगळयांना विश्वासात घेऊन पूर्ण करायचा आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात भाविकांनी गर्दी केली आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शासकीय महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या मानदुमला गावच्या बबन घुगे आणि सौ. वत्सला घुगे यांना मिळाला. मागच्या 15 वर्षापासून हे दाम्पत्य कार्तिक यात्रा करत आहेत. आज विठूरायाची महापूजा करण्याचा मान मिळाल्याने भरून पावल्याची भावना घुगे दाम्पत्याची होती. सर्वांना सुखी ठेव. राज्यातील शेतकऱ्यांला सुखी ठेव, अशी प्रार्थना, त्यांनी केली.