भारताच्या दक्षिण किनारपट्टीजवळ ‘फेंगल’ चक्रीवादळ घोंगावतं आहे. या वादळाचा महाराष्ट्रातही फटका बसणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल आहे. थंडी कमी झाली आहे. 6 डिसेंबरेपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, असं पंजाबराव डख म्हणालेत. ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याने पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे. कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या शेतमालाला चांगले झाकून ठेवा, असं डख म्हणालेत.
राज्यात उद्या म्हणजेच 3 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव परिसरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. फेंगल हे चक्रीवादळ येत्या 24 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची काळजी घ्यावी, असं आवाहन पंजाबराव डख यांनी केलं आहे.
फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात पाऊस होणार आहे. तर विदर्भातील यवतमाळ, नागपूर, बुलढाणा, जालन्यात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड, मालेगाव, जळगाव या भागात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. 8 डिसेंबरपासून राज्यातील हवामान स्वच्छ होऊन पुन्हा थंडीला सुरूवात होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
‘फेंगल’ हे चक्रीवादळ सध्या दक्षिण किनारपट्टीवर आहे. त्यामुळे वातावरणावर परिणाम झाला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक भागात नुकसान झालं आहे. तर या ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. हवमान खात्याने याबाबतचा अलर्ट दिला आहे. शिवाय पंजाबराव डख यांनीही पावसाबाबतचा अंदाज वर्तवला आहे.