औरंगाबाद: पाण्याच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे अत्यंत विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या नव्हत्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच पंकजा मुंडे (Pankaja munde) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ज्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पाणी प्रश्नावर मोर्चा (jal akrosh morcha) काढण्यात आला. त्या मोर्चाची पंकजा मुंडे यांनी संभावना केली आहे. मी राष्ट्रीय लेव्हलवर काम करते. कालच्या मोर्चात कदाचित माझी उपस्थिती अपेक्षित नसावी. त्यामुळे मी आले नाही. पण कालचा मोर्चा हा लोकल लीडर्सचा मोर्चा होता, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा यांच्या या धक्कादायक विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून भाजपमध्ये धुसफूस असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. पंकजा मुंडे या मीडियाशी संवाद साधत होत्या.
मी पाणी प्रश्नावर सातत्याने काम केलं आहे. जलयुक्त शिवार या संकल्पेनेवर मी काम केलं आहे. पाणी प्रश्नावरील कोणत्याही योजना असल्या तरी मी काम करते. त्यामुळे मोर्चात मी नसले तरी त्या प्रश्नावर मी जागरूक नाही असं म्हणता येणार नाही. त्या प्रश्नावर मी संवेदनशील आहे. असे अनेक मोर्चे निघतात. मी राष्ट्रीय लेव्हलवर काम करत असल्यामुळे कदाचित लोकल लोकांनी तो मोर्चा काढला असेल. ती चांगली गोष्ट आहे. मी त्या मोर्चात अपेक्षित असते तर मी नक्की आले असते. कदाचित तो लोकल लीडरचा मोर्चा होता त्यामुळे मी आले नाही, असा सणसणीत टोला पंकजा मुंडे यांना लगावला आहे.
भाजपच्या मोर्चात पैसे देऊन लोक आले होते, असा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने त्याबाबतचे व्हिडीओही व्हायरल केले आहेत. त्याबाबत विचारलं असता, आरोप सिद्ध करावा. व्हिडीओ मोर्चातील आहे की नाही ते पाहावं लागेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. जलयुक्त शिवार योजना ही देवेंद्र फडणवीसयांची होती. राज्य सरकारची होती. सध्याच्या आघाडी सरकारने त्या योजना घ्याव्यात. पण मोडीत काढू नये. जलयुक्त शिवार योजनेत काही त्रूटी असतील तर दुरुस्त कराव्यात. राज्यात सतत ओला दुष्काळ आहे. त्यामुळे सरकारला त्याची तीव्रता जाणवली नाही, असंही त्या म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मोर्चात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाची आठवण सांगितली. त्या मोर्चानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं होतं, असं फडणवीस म्हणाले. त्याबाबत पंकजा यांना विचारण्यात आले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. आम्हीही खूप मोर्चे काढले आहे. आमच्या मोर्चांमुळे सत्ता परिवर्तन झालं. एल्गार मोर्चे, संघर्ष मोर्चा मी काढला होता. त्यामुळे सरकार गेलं होतं, असा दावाही त्यांनी केला.
कालच्या मोर्चाचं पंकजा मुंडे यांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे त्या आल्या नाहीत. पण कालच्या मोर्चाला केंद्रीय मंत्री असलेले डॉ. भागवत कराड दिल्लीतून आले होते. तर, भोकरदन मतदारसंघातील खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सुद्धा भोकरदनहून आले होते. कराड यांनी तर मोर्चाची पाहणी केली होती. मोर्चाच्या तयारीचा आढावा घेतला होता. फडणवीस यांच्या नेतृत्वातील या मोर्चातून पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.