मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणीत आहेत. तिथे त्यांची सभा पार पडली. परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना- महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद भरोसे आणि जिंतूर मतदारसंघातून भाजप- महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी शिंदे परभणीत आहेत. लाडकी बहीण योजनेवर शिंदे बोलले आहेत. लाडक्या बहिणीसाठी जेलमध्ये जायचं असेल तर एक वेळा नाही तर शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. मी संघर्षातूनवर आलोय. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहे. कोणी माझ्या केसाला धक्का लावू शकत नाही. पाच हप्ते बहिणीच्या खात्यात दिले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
शेतकऱ्यांचा विज बिल माफ करण्याचे काम आम्ही केला आहे. लाडकी बहीण योजना आम्ही चालू केली आहे. विरोधकांच्या पोटात दुखलं. महायुती सरकार म्हणजे ही देना बँक आहे लेना बँक नाही… बहिणींसाठी आम्ही आखडता हात घेणार नाही. यांना दीड हजारची किंमत कळणार नाही. मात्र माझ्या लाडक्या बहिणींना त्याची किंमत माहिती आहे. लाडक्या बहिणीसाठी आपण योजना राबवली आहे. लाडक्या बहिणीची योजना मी बंद होऊ देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
विरोधक म्हणतात लाडके बहीण योजनेची चौकशी लावू, आम्हाला जेलमध्ये टाकू… अरे कोणाला धमकी देता, तुम्ही सरकारमध्ये येणारच नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करा. सगळे लोक आनंद भरोसे यांच्या कामाला लागले तर विरोधकांचा डिपॉझिट वाचणार नाही, असंही ते म्हणाले.
परभणीतील सभेत त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. आनंद भरोसेवर भरोसा करा. आनंद भरोसेवर भरोसा म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंवर भरोसा… मेघना बोर्डीकर या उमेदवार आहेत. मेघना बोर्डीकर यांना विजयी करा. 23 तारखेला दिवाळीचे फटाकडे फोडायला मी तुमच्यासोबत येणार आहे. तुम्ही वेळ काढून आनंद भरोसे यांना मतदान करा. मेघना बोर्डीकर यांना मतदान करा. हे दोघे पाच वर्ष तुमची सेवा करतील. आम्ही मालक नाही सेवक आहोत, असा शब्द शिंदेंनी परभणीकरांना दिला.