परभणी : शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेना पक्षातील नेत्याने खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. एकीकडे शिवसेनेला काहीही मिळत नाही, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांना मात्र सर्व दिले जाते. शिवसेनेला डावलले जाते, असा आरोप संजय जाधव यांनी केला आहे. आधी भाजपाकडून विरोध झाला. आता मात्र आमचे मित्रपक्षच आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. आता त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संजय जाधव यांनी राष्ट्रवादीवरही टीकेची झोड उठवली आहे. पुण्यात 25 ते 29 मे या कालावधीत शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाची पुण्यातील जबाबदारी जाधव यांच्यावर आहे. पुण्यातील विकासकामे, समस्या, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत तसा अहवाल ते पक्षाकडे सादर करणार आहे. तत्पूर्वी त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली.
खासदार जाधव म्हणाले, की शिवसेनेचा मुख्यमंत्री असून पाठबळ मिळत नसल्याने येथील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. भाजपाचे, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. आघाडीच्या निकषांप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार त्यांना 60 टक्के आणि इतरांना 20-20 टक्के सत्तेचा शेअर मिळायला हवा. पण विकासकामांमध्ये हा शेअर मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत या बाबी पोहोचवणार आहे. तर पालकमंत्री अजित पवार यांनी आघाडीच्या निकषांप्रमाणे आम्हाला आमचा शेअर द्यावा, अशी त्यांना विनंती असल्याचे संजय जाधव म्हणाले. दरम्यान, संजय जाधव यांच्या या भूमिकेबाबत शिवसेना तसेच उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.