महेंद्र जोंधळे, लातूर | 16 डिसेंबर 2023 : 13 डिसेंबर रोजी संसदेच्या लोकसभा सभागृहात दोन तरुणांनी स्मोक कँडल फोडले. त्या दोन तरुणांच्या या कृत्यामुळे देशाला हादरा बसला. यामुळे संसदेच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. लोकसभेत स्मोक कँडल फोडणाऱ्या त्या दोन तरुणांपैकी एक तरुण महाराष्ट्रातील लातूरचा रहिवाशी आहे. लातूरचा अमोल शिंदे याचा या प्रकरणात सहभाग आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. याच आरोपी अमोल शिंदे याच्या आई वडिलांनी आता मोठा इशारा दिलाय.
महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी अमोल शिंदे हा या प्रकरणातील एक आरोपी आहे. त्याचे आई-वडील हे मजूर आहेत. अमोल शिंदे हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्यादिवशी तो घरून काही न सांगता निघाला. ती कुठे गेला याची काहीच कल्पना घरच्यांना नव्हती. संसदेच्या स्मोक कँडल प्रकरणात त्याचे नाव आले आणि घरच्यांना धक्का बसला.
अमोल शिंदे याला वकील असिम सरोदे यांनी कायदेशीर मदत करण्याचं जाहीर केले आहे. परंतु, गेले चार दिवस अमोल पालकांच्या संपर्कात नाही. त्यामुळे त्याचे पालक हवालदिल झाले आहेत. मजुरी करून उपजीविका भागविणारे अमिल शिंदे याच्या आई वडिलांना गावात कुणीही मजुरीला बोलवत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर अडचण निर्माण झालीय.
अमोल शिंदे याच्या आई वडिलांनी त्याचा संपर्क होत नसल्याने आता मोठा इशारा दिला आहे. अमोल यांचे वडील यांनी सांगितले की, अमोल याच्याशी चार दिवस कोणताही संपर्क झाला नाही. किमान फोनवर तरी त्याचा संपर्क करून द्यावा. आमचा मुलगा मेला की जिवंत आहे हे तरी आम्हाला कळू द्या. चार दिवस सारखे पोलीस घरी येत आहेत. चौकशी करत आहे. हे जे काही घडलं आहे त्यामुळे गावात कुणी कामही दत नाहीत असे ते म्हणाले.
कलेक्टर यांच्या कार्यालयात जावे. गावात कुणी काम देत नाही. इथे उपाशी मरण्यापेक्षा तिथे जाऊन आत्महत्या करावी असे वाटतय. लेकराच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं. घरासाठी कर्ज काढले. आता कुणी काम देत नाही तर ते फेडायचं कसं? पैसे नाहीत. पोलीस शेतात येतात. घरात येतात त्यापेक्षा तिथे जाऊन शेवटचा पर्याय हा आत्महत्याच आहे. अमोलशी संपर्क करून द्या अन्यथा आम्ही टोकाचं पाऊल उचलू असा इशारा त्यांनी दिला आहे.
अमोल शिंदे याच्या आईनेही त्या घटनेनंतर पोलीस घरी आले. माझी सही घेऊन गेले. खूप वेळ चौकशी केली. पण, त्याने असे का केले यांची आम्हाला काहीच माहिती नाही. त्याची नोकरी भरतीची इच्छा होती. नोकर भरतीसाठी तो सारखे प्रयत्न करत होता. अभ्यास करत होता. पण, नोकरी नसल्याने तो टेन्शनमध्ये होता. त्याच टेन्शनमध्ये त्याने हे काही केले का? याची आम्हाला माहिती नाही. घरातून निघताना त्याला ठेचा बांधून दिला होता तेच घेऊन तो गेला. गेले चार दिवस काही बोलणे झाले नाही. तो कुठे आहे, कसा आहे इतकं तरी बोलणे करून द्या अशी मागणी त्यांनी केली.