मुंबई : 4 ऑक्टोबर 2023 | तीनही पक्षांचा समन्वयक म्हणून मला वाटतं की, सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये कुठलीही धुसपुस नाही. काही लोक याबाबतीतली पतंग उडवत आहेत. त्यामध्ये लक्ष देण्यासारखं काहीच नाही. अजितदादा यांना पुण्याचे पालकमंत्री पद दिले. पूर्वीदेखील त्यांच्याकडे पालकमंत्री पद होतं. तर, चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन – दोन पालकमंत्री पदे दिली आहेत. सोलापूर आणि अमरावती हे दोन्ही अतिशय महत्वाचे जिल्हे आहेत. तर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये मुंबईतील सहा लोकसभेच्या जागा कशा जिंकता येतील यावर विचार मंथन झाले अशी माहिती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलीय.
नांदेड येथील घटनेबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक स्टेटमेंट केले आहे. ज्यांचा निष्काळजीपणा होता त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. आमची देखील ज्यांनी निष्काळजीपणा केला त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आहे. कारण सर्वसामान्यांचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालय आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा हे सरकार सहन करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
गणेश नाईक हे एक ज्येष्ठ नेते आहेत. तर, विजय चौगुले देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून नेते झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यात कोणतीही धुसफूस नाही. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम लोकं करत आहेत. आम्ही सर्व एक आहोत. एक दिलाने काम करत आहोत. महाराष्ट्राचा विकास करून महाराष्ट्राला पुढे न्यायचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने होत राहील असे प्रसाद लाड म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी कोणाला कुठून उमेदवारी द्यावी आणि कोणाला न द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, भाजपचा उमेदवार हा केंद्राकडून दिला जाईल. त्याला संपूर्ण ताकतीने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व भाजप पदाधिकारी सक्षम आहोत. मुंबईतील सहा जागा भाजप आणि महायुती सरकार जिंकेल याची मला खात्री आहे, असा दावा त्यांनी केला.
भास्कर जाधव नावाचा पोपट ज्योतिष देखील सांगतो हे मला माहित नव्हतं. परंतु, राज्याच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी भास्कर जाधव यांनी अशा प्रकारची स्टेटमेंट का केले? कोणाच्या बोलण्यावर केले आणि एवढ्या गंभीरपणे जे स्टेटमेंट केलं त्याची चौकशी करावी. त्यांना ताब्यात घ्यावे. पोपट मिरची खाल्ली की खूप बोलतो अशा पोपटाकडे लक्ष देऊ नये, असा टोला त्यांनी लगावला.