बदलापूर : अनेक वेळा एसी लोकलला विरोध करुनही, ऐन गर्दीच्या वेळी घरी पोहोचायचं असतं, तेव्हा एसी लोकल प्लॅटफॉर्मला येते आणि एक दोन डोकी चढतात आणि उतरतात आणि ही खाली लोकल निघून जाते आणि रेल्वे फलाटांवर प्रवाशांची गर्दी वाढत जाते. रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांनी एसी लोकल(AC Local) बंद करण्याची मागणी केली होती, पण या उलट एसी रेल्वेच्या फेऱ्या वाढल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.
बदलापूर स्टेशनवर(Badlapur Railway Station) आज एसी लोकल नको म्हणून प्रवाशांनी विरोध केला, प्रवाशी गाडी अडवतील की काय अशी भीती होती, पण पोलिसांनी यात हस्तक्षेप केला.
एसी लोकल अशाच सुरु राहिल्या तर एकेदिवशी प्रवाशांचा संतापाचा उद्रेक होईल, आम्हाला एसी लोकल नको, आम्हाला ती परवडत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
सीएसएमटीहून बदलापूरसाठी संध्याकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी फास्ट लोकल सुटते. मात्र काही दिवसांपासून ही लोकल एसी करण्यात आली आहे. त्यामुळे या लोकलच्या मागून सुटणाऱ्या 5 वाजून 33 मिनिटांच्या खोपोली फास्ट लोकलने बदलापूरकरांना यावं लागतं. या लोकलला अचानक प्रवाशांची संख्या वाढल्यानं मोठी गर्दी होऊ लागली असून दुसरीकडे ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकल मात्र मोकळीच जात असल्यानं प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून प्रवासी यामुळे वैतागले आहेत. 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास खोपोली लोकलने उतरलेल्या बदलापूरकरांनी थेट स्टेशन मास्तर ऑफिस गाठत आपला संताप व्यक्त केला. तसंच गर्दीच्या वेळी सोडली जाणारी एसी लोकल बंद करत त्याजागी पुन्हा साधी लोकल सोडण्याची मागणी केली. आज देखील प्रवाशांनी एसी लोकल अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकात गोंधळ घातला.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील AC लोकल विरोधात आक्रमक झाले आहे. मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्याची संख्या 40 लाख आहे. जर त्यातले 5 लाख प्रवासी एसीच्या प्रेमात आहेत. पण, 35 लाख प्रवाशांचं काय करणार, 2 लाख प्रवाशी रस्त्यावर उतरले तर मिलेट्री आली तरी काही होणार नाही. आंदोलन फक्त एका नाही तर प्रत्येक स्टेशनवर सुरु होईल. मुंब्रा, ठाणे, बदलापूरला आंदोलन झालं. हे प्रकरण रेल्वेनं आता रोखलं नाही तर लोक आंदोलन करतील असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.