प्रवासी रशियाचा, पण स्मारक उभं राहिलं महाराष्ट्रात; कोण आहे का मुसाफिर अफनासी निकितिन

| Updated on: Jan 09, 2024 | 11:13 PM

1469 मध्ये एका रशियन मुसाफिर भारतात आला होता. त्याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. विशेष म्हणजे त्या रशियन मुसाफिरचे महाराष्ट्रात स्मारक बांधण्यात आलंय. कोण होता तो मुसाफिर?

प्रवासी रशियाचा, पण स्मारक उभं राहिलं महाराष्ट्रात; कोण आहे का मुसाफिर अफनासी निकितिन
Afanasy Nikitin monument in raigad
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 08 जानेवारी 2024 : 1957 साली एका परदेशी मुसाफिरची कहाणी सांगणारा ‘परदेसी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. भारतीय आणि रशियन कलाकारांची यात प्रमुख भूमिका होती. नर्गिस, पृथ्वीराज कपूर, बलराज साहानी यांच्यासह रशियन अभिनेता ओलेग स्ट्रिझनोव्ह यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. तर, लता मंगेशकर, मन्ना डे, मीना कपूर यांनी त्यातली गाणी गायली होती. हा चित्रपट म्हणजे भारत आणि रशिया यांच्या मैत्रीपूर्ण संबधांची महती सांगणारा होता. 1469 मध्ये एका रशियन मुसाफिर भारतात आला होता. त्याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. विशेष म्हणजे त्या रशियन मुसाफिरचे महाराष्ट्रात स्मारक बांधण्यात आलंय. कोण होता तो मुसाफिर?

1433 साली रशियाच्या त्वेर शहरात जन्मलेला अफनासी निकितिन हा एक रशियन व्यापारी. त्वेर ही त्याकाळातली रशियातली एक मोठी व्यापारी पेठ. इथले व्यापारी युरोप, मध्य आशिया अशा दूरवरच्या ठिकाणी प्रवास करत. तिथल्या विविध आणि वैशिठ्यपूर्ण वस्तू घेऊन त्या त्वेरमध्ये जाऊन विकत. यात त्यांना प्रंचड नका होत असे. अफनासी यालाही दूरवरच्या प्रवासाचे वेड लागले. 1466 साली त्याने प्रवास सुरू केला.

रशियाच्या व्होल्गा नदीतून त्याने प्रवास सुरु केला. कॅस्पियन ते इराण हा प्रवास त्याने समुद्रमार्गे केला. पुढे होर्मुझमार्गे अरबी समुद्रातून तो भारतातल्या दीवजवळ पोहोचला. गुजरातच्या खंबाट येथे त्याने रशियात मोठ्या प्रमाणात मागणी असलेली नीळ खरेदी केली. तिथून पुढे बोटीनं अफनासी रायगडच्या चौल बंदरात आला. भारतात आलेला पहिला रशियन प्रवासी हा महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर उतरला होता.

अफनासी निकितिन याला दररोज डायरी लिहिण्याची सवय होती. याच डायरीत त्याने भारतातील त्या काळातील महत्वाचा नोंदी लिहून ठेवल्या आहेत. भारतातील प्रवास संपवून काळ्या समुद्रामार्गे तो पुन्हा रशियाला निघाला. पण, त्वेरला पोहोचेण्यापूर्वीच 1472 साली स्मॉलन्स्क येथे त्याला काळाने गाठले. काही वर्षांपूर्वी त्याची ही डायरी रशियातील एका मठात सापडली. या डायरीला रशियन प्रवाशाने भारताचं केलेलं प्रवासवर्णन म्हणून ओळखलं जातं.

अफनासी निकितिन यान रायगडच्या चौलमध्ये पाऊल ठेवलं त्याच वर्णन करताना तो म्हणतो, ‘इथे लोक उघडे राहतात. इथे सगळेच अनवाणी असतात. येथील स्त्रिया कमरेला फक्त एक कापड गुंडाळतात. श्रीमंत व्यक्तीच्या मात्र डोक्याला, खांद्यावर आणि कमरेभोवती एक असे कापड असते. ते काळ्या रंगाचे आहेत.’

चौलवरून पुढे जुन्नरला जाण्यासाठी त्याला पंचवीस दिवस लागले. याविषयी तो लिहितो, ‘इकडे चार महिने दिवस रात्र पाऊस आणि चिखल असतो. खडकाळ भागावर वसलेल्या या शहराला संरक्षक भिंत नाही.’ त्याकाळी दख्खनमध्ये बहामनी राजवट आणि विजयनगरचं साम्राज्य होतं. निकितिन याने त्याचीही नोंद डायरीत लिहून ठेवली आहे. गोवळकोंडा आणि रायचूर येथे त्याने हिऱ्याच्या खाणी बघितल्या. श्रीशैल मलिल्कार्जुनाची यात्रा केली. रमझानमध्ये रोझे पाळले. जवळपास साडे तीन वर्ष तो भारतात राहिला.

अफनासीच्या मृत्यूनंतर भारत आणि रशियात अनेक साम्राज्य उदयास आली. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारत रशिया यांच्यात मैत्रीचं प्रतीक म्हणून निकितिनकडे पाहिलं गेलं. निकितिनची हीच आठवण रायगडच्या चौल येथे जपून ठेवली आहे. रशियन दूतावासाच्या सहकार्यानं रेवदंडा येथे अफनासी निकितिनचं स्मारक बांधण्यात आलंय.

रेवदंडा येथील सरदार रावबहाद्दूर तेंडुलकर शाळेच्या प्रांगणात एक उभा स्तंभ आहे. हेच अफनासी निकितिनचं स्मारक होय. त्याकाळी श्रीमंत आणि सामान्य यांच्यात आढळलेली तफावत, जाती-जातींमधला फरक ही त्याने लिहून ठेवलेली निरीक्षणे भारतीय संस्कृतीचा दाखला देणारी उदाहरणे आहेत.