बच्चू कडू यांच्यानंतर महायुतीतील आणखी एका मित्रपक्षाचा स्वबळाचा नारा, 30 जागा लढवणार; कॅबिनेट मंत्रीपदही हवं

| Updated on: Jun 15, 2024 | 6:45 PM

महायुतीत आता भाजपाच्या लोकसभेच्या जागा घटल्याने पक्षाने आता दुसऱ्यांची ओझी वाहण्यापेक्षा स्वबळावर जागा लढवाव्यात अशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे. तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढविण्याची भाषा करीत आहेत.

बच्चू कडू यांच्यानंतर महायुतीतील आणखी एका मित्रपक्षाचा स्वबळाचा नारा, 30 जागा लढवणार; कॅबिनेट मंत्रीपदही हवं
AJIT PAWAR, EKNATH SHINDE AND DVENDRA FADNAVIS PHOTO
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

ठाणे – एकीकडे लोकसभा निवडणूकीनंतर लगेचच राज्यात विधानसभा निवडणूका लागणार आहेत. महायुतीला यंदा लोकसभा निवडणूकीत कमी जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला आहे. महायुतीत शिंदे गटाला लोकसभेच्या कमी जागा लढवूनही पदरात जादा जागा मिळाल्याने आमचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी सांगत महायुतीत आता आम्हीच मोठा भाऊ आहोत असे म्हटले आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी आम्ही कोणाकडे जागा मागायला जाणार नाही, आम्ही स्वबळावर 150 ते 200 जागा लढवू असा नारा दिला आहे. तर महायुतीचे नेते बच्चू कडूंनी देखील आम्ही जास्तीस जास्त जागा लढवू असे म्हटले आहे. यातच आता आणखी एका मित्रपक्षाने 30 जागा लढविण्याची घोषणा करुन भाजपाला चॅलेंज दिले आहे.

महायुतील एक घटक पक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत अनेक मागण्या केल्या आहेत. आम्ही एक जनाधार असलेल्या पक्ष असल्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा. तसेच, विधानसभा निवडणुकीत आम्हाला योग्य जागा दिल्या नाहीत तर आम्ही 30 जागा लढू, असे पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

आम्हाला सत्तेत वाटा हवा

प्रा. जोगेंद्र कवाडे पुढे म्हणाले की, ‘आम्ही महायुतीचे घटक आहोत. आता केंद्रात एनडीएचे सरकार आले आहे. या सरकारने शोषीत, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. आता निवडणुका संपल्या आहेत. निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात. शत्रू नसतात, याचे भान ठेवून कोणीही दुखावणार नाही, याची काळजी सत्ताधारी वर्गाने घ्यायला हवी, असे सांगत त्यांनी आम्हाला सत्तेत वाटा हवा आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याने आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद तसेच एखाद्या महामंडळात प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी कवाडे यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगल्या जागा द्याव्यात, अन्यथा, आम्ही 30 जागांवर निवडणूक लढवू, असेही कवाडे यांनी म्हटले आहे.

सरकारने एसी आणि एसटीबाबत योग्य निर्णय घ्यावा

संविधान बदलण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही. भाजपमधील काही लोकांनी याबाबत विधाने केली होती. त्याविरोधात आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर अशी विधाने करणाऱ्यांवर भाजपने कारवाई केली, असेही प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. विधानसभा निवडणुकीत आमच्या कोर कमिटीने ठरविल्याप्रमाणे  30 ते 31 जागा लढवण्याची आमची तयारी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशीही जागेवाटपाची चर्चा होईल, शिवशक्ती आणि भीमशक्तीची आजपासून सुरुवात होईल, अनुसुचित जाती जमातीबाबत मागण्यासंदर्भात सरकारने योग्य ती भुमिका घ्यावी असे प्रा.कवाडे यांनी म्हटले आहे.

निदान 11 जागा तरी वाटाघाटीत मिळाव्यात

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद तसेच महामंडळात 3 ते 4 पदे मिळावी अशी आशा आहे. विधानसभेत 31 जागा लढवण्याचा निर्णय आज कोर कमिटीने घेतला आहे. जागा वाटपामध्ये कोणत्या ठिकाणी जागा मिळणार याबाबत चर्चा करू. निदान 11 जागा तरी वाटाघाटीत मिळाव्यात अशी पक्षाची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचे आयोजन येऊर येथे झाले. प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी ही बैठक आयोजित केली होती. या प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, गणेश उन्हावणे, चरणदास इंगोले, प्रमोद टाले, अजमल पटेल, कपील लिंगायत, एन. डी. सोनकांबळे, अनिल तुरूकमारे, विजय वाघमारे, आनंद कडाळे, नागसेन क्षीरसागर, रत्नाताई मोहोड, मृणाल गोस्वामी, शमी खान, राजेंद्र हिवाळे, अशोक कांबळे, नंदकुमार गोंधळी उपस्थित होते.