महाविकास आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही, उद्या काय होणार?; संजय राऊत यांचं विधान काय?

| Updated on: Aug 31, 2024 | 12:39 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमध्ये पुतळा कोसळल्याने राज्यातील जनतेच्या संतप्त भावना आहेत. राज्यातील जनतेने जोरदार आंदोलन केलं आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील जनतेची माफी मागितली. तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यातील जनतेची माफी मागितली आहे.

महाविकास आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही, उद्या काय होणार?; संजय राऊत यांचं विधान काय?
Image Credit source: PTI
Follow us on

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार आंदोलन केलं. आता महाविकास आघाडी एकत्रितरित्या उद्या मुंबईत आंदोलन करणार आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला अजूनही पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आघाडीकडून आंदोलन होणार की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

मुंबई पोलीस, मिंधे सरकार आणि त्यांच्या पक्षातील पेशव्यांचे घाशीराम कोतवाल. ते शेवटपर्यंत लोकभावनेचा उद्रेक लोकशाहीने दडपण्याचा प्रयत्न करतील. पण शिवरायांचा जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात अपमान झाला, तेव्हा पंतप्रधान असो की अन्य कुणी असो त्यांना गुडघे टेकावे लागले. मोरारजी देसाई हे गुजरातचे त्या काळातील पंतप्रधान होते. त्यांनीही शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. त्यांनाही मोदींप्रमाणे माफी मागावी लागली. हे मिंध्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

रक्त तपासावं लागेल

मिंधे आणि त्यांच्या सरकारचं रक्त तपासावं लागेल. ते खरोखरच मराठे आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घोर अपमान होऊनही ते लोकभावनेचा उद्रेक दडपशाहीने करू इच्छितात यांचे रक्त मराठ्यांचे नसून काही वेगळं रसायन असावं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

उद्या आंदोलन कुठे?

महाविकास आघाडीने उद्या सकाळी 10 वाजता जोडे मारा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची सुरुवात फोर्ट परिसरातील हुतात्मा चौकातून होणार आहे. हुतात्मा चौकातून हे आंदोलक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात येतील. तिथून ते गेट वे ऑफ इंडियाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाची सांगता करतील. या आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार, खासदार, बडे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. हे आंदोलन एक ते दोन तास चालेल असं सांगितलं जात आहे.