तुम्ही सापाच्या बिळात हात घालायला सांगा किंवा आकाशात उडणाऱ्या विमानातून थेट उडी टाकायला सांगा… भले भले लोक तुमचं हे चॅलेंज स्वीकारणार नाहीत. पण जगात असे 400 जण आहेत. ज्यांना यापैकी कोणताही प्रकार करण्याची भीती वाटत नाही. हे लोक खरंच धाडसी आहेत का? तर नाही. कारण त्यांना एक प्रकारचा आजार आहे. काय आहे हा नेमका प्रकार थोडं समजून घेऊयात…
काही वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या एका महिलेचं प्रकरण समोर आलं. ती कशालाच घाबरत नव्हती. घरच्यांनी सांगितलं म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्निया येथील न्युरोसायन्स विभागात आली. तिथं डॉक्टरांनी निरीक्षण केलं. ही महिला कुणाच्याही अगदी जवळ जाऊन बोलते. आधी हे विचित्र वाटलं. पण नंतर आणखी थोड्या विचित्र घटना घडल्या. ती महिला अनोळखी लोकांना किंवा नव्या ठिकाणीही घाबरत नव्हती. किंवा शस्त्रास्त्रांनाही भीत नव्हती. या महिलेला एसएम नाव देण्यात आलं. तिची ओळख लपवली गेली अन् अनेक वर्ष तिच्यावर अभ्यास केला गेला.
एसएम ही एकमेव अशी महिला नाहीये. जगात जवळपास 400 असे लोक आहेत. ज्यांना कोणत्याही व्यक्ती किंवा परिस्थितीची भीती वाटत नाही. या सगळ्यांना एक प्रकारचा आजार आहे. ज्यामुळे मेंदुतला भीती नावा फॅक्टरच अॅक्टिव्ह रहात नाही. वैज्ञानिकांनी या आजाराला अर्बेक विथ डिसीज असं नाव दिलंय.
हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. या आजारात मेंदूतला एमग्डेला नावाचा भाग एवढा कठोर होतो की, तिथपर्यंत भीतीचे संकेत पोहोचतच नाहीत.
अर्बेक विथ हा एक ऑटोसोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे. म्हणजे हा दुर्मिळ आनुवंशिक आजार आहे. शरीरातील कोलोजन नावाचं प्रोटीन गरजेपेक्षा जास्त तयार होतं. शरीरातील प्रोटीनपैकी एक तृतीयांश भाग कोलोजन असतं. हे हाडांपासून त्वचा, केसांपर्यंत आढळतं. याच प्रोटिनचं प्रमाण वाढल्यास सॉफ्ट टिश्यूंसह ते संपूर्ण शरीरात साठण्यास सुरुवात होते. याचा परिणाम मेंदूपर्यंत जातो आणि एमिग्डेलात एका मोठ्या भागाला घेरतो. त्यामुळे न्यूरॉन्सची संदेशप्रक्रिया ठप्प होते.
चेतापेशींनी बनलेला एक बदामाच्या आकाराचा भाग म्हणजे एमिग्डेला. तो एखाद्या परिस्थितीवर प्रक्रिया करतो. भावना निर्मिती झाल्यावर त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची, हे एमिग्डेला पाहते. म्हणजे आपण गच्चीवर गेल्यावर काठांपासून अगदी सावधगिरीने चालतो. पण हे लोक अगदी बिनधास्त चालतात. जणू काही बगीचात फेरफटका मारताहेत.
या लोकांधली भीती जवळपास संपुष्टात आलेली असते. विशेषतः एखाद्या परिस्थितीत हे लोक निर्णय घेऊ शकत नाहीत. असुरक्षित असूनही रात्री-अपरात्री फिरत अससतात. जड आवाज, रुक्ष त्वचा, जखमा उशीरा भरणे, डोळ्यांवर परिणाम अशी काही लक्षणं या रुग्णांमध्ये आढळून येतात. काही वर्षांनी या रुग्णांना झटकेदेखील येऊ शकतात.