मुंबई / ब्रिजभान जैस्वार : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्टशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात सदानंद कदम यांना अटक झाल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) याआधी दोघांचीही चौकशी केली आहे. त्यामुळे कदम यांना अटक होताच अनिल परब यांनी त्यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईचा ससेमिरा रोखण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. संपूर्ण राजकीय वर्तुळाचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे सोमवारी परब यांच्या याचिकेवर होणारी सुनावणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
ईडीने संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावला आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातही या केंद्रीय तपास यंत्रणेने अनेक हायप्रोफाईल प्रकरणांच्या तपासाला गती दिली आहे. मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणातील आर्थिक अफरातफरीच्या आरोपाची चौकशी ईडीने सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात या प्रकरणात माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांचे सदानंद कदम यांना अटक केली. त्यानंतर परब यांच्या बाबतीत ईडी कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ईडीकडून कारवाई तीव्र केली जाण्याची शक्यता असल्यामुळे परब यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. परब यांनी त्यांच्याविरोधात ईडीने दाखल केलेला ईसीआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी सोमवारी याचिका दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
अनिल परब यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी आपल्या याचिकेवर तातडीची सुनावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती केली. ईडीला कठोर कारवाई करण्यापासून रोखण्याचीही विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. न्यायालयाने सोमवारी झालेल्या प्राथमिक सुनावणीवेळी याचिकेची गंभीर दखल घेतली. याचवेळी याचिकेवर मंगळवारी युक्तिवाद ऐकण्यासाठी सुनावणी निश्चित केली. दरम्यान अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम हे सध्या ईडीच्या कोठडीत आहे. शनिवारी सुट्टीकालीन न्यायालयाने कदम यांची 15 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी केली आहे.