सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरणात कोठडीत असणारे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) त्यांच्या एका ट्विटमुळेही चर्चेत आले आहेत. चार ठिकाणी जामीन फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी बुधवारी शरण येत कोर्टात हजेरी लावली. त्यानंतर कोर्टाने नितेश राणे यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलं. मात्र या कोठडीआधी नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला इशारा देत एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी सध्याचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि माजी गृहमंत्री चिदंमबरम यांचा फोटो टाकला होता. त्या फोटाला नितेश राणे यांनी तसेच तगडा कॅप्शनही दिले होते, “समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है” अशा आशयाचे सूचक ट्विट राणे यांच्याकडून करण्यात आलं होतं. काल दिवसभर याच ट्विटची चर्चा होती. पण हेच ट्विट नितेश राणे यांना आता महागात पडलं आहे.
अमित शाह आणि चिदंमबरम यांचा फोटो वापरून केलेले ट्विट नितेश राणे यांना डिलीट करावं लागलं आहे. 2009 ला पी. चिदंमबरम गृहमंत्री असताना अमित शाह यांना अटक झाली होती, तर अमित शाह गृहमंत्री असताना चिदंमबरम यांना अटक झाली होती. त्यामुळे नितेश राणे यांना महाविकास आघाडीला आमचीही वेळ येईल तेव्हा तुम्हालाही अशीच वागणूक मिळेल, असा इशाराच जणू दिला होता. त्यामुळे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं, मात्र याच ट्विटचा परिणाम उलटा झाला. सिंधुदुर्गातला वाद दिल्लीपर्यंतच्या नेत्यांपर्यंत नेणं नितेश राणे यांना महागात पडलं आणि त्यांना शेवटी ते ट्विट डिलीट करावं लागलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे यांची जामीनासाठी पळापळ सुरू होती. सत्र न्यायालयापासून ते दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊनही नितेश राणे यांना जामीन मिळाला नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी निराशा आली. नितेश राणे यांच्या जामीनासाठी कालही त्यांच्या वकिलांची धडपड सुरू होती, मात्र कालही त्यांना जामीन मिळाला नाही. राणे घराणं आणि शिवसेनेचा वाद महाराष्ट्राला नवा नाही. नितेश राणे महाविकास आघाडीवर तुटून पडण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आदित्य ठाकरेंना म्याव म्याव केल्यावरूनही बराच वादंग रंगला होता. आता अटकेआधीही असे ट्विट केल्याने नितेश राणेंना अंतर्गत कानटोचणीला समोरे जावे लागले आहे.