विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात राज्याच्या राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहे. राष्ट्रवादी पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार पडलं आहे. अजित पवार गटाचे 39 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील 39 पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या 20 तारखेला हा पक्षप्रवेश होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची ताकद मात्र वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा करिश्मा चालला नाही. अजित पवार गटाला केवळ रायगडची जागा जिंकता आली. त्यातच आता राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. असं असतानाच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील 39 पदाधिकांऱ्यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी- चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीत फूट पडण्याआधीही पिंपरी- चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांना मानत होते. त्याचमुळे अनेकांनी शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांसोबत महायुतीत जाणं पसंत केलं. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवारांना हा मोठा धक्का बसला आहे.
मागच्या काही दिवसांपासून पिंपरीतील काही नेते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. शरद पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. यावेळी पक्षातून बाहेर गेलल्यांना परत पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हापक्ष सोडून गेलेलं लोक परत येण्याबाबत मला कोण भेटलं नाही. पण जयंत पाटील यांना भेटले आहेत. याची मला माहिती आहे, असं शरद पवार म्हणाले.