पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायभरणी करण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचे कौतुक केले. नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या प्रवासाबद्दलही सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कार यज्ञ आहे. जो अंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टीसाठी काम करत आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले.
आपल्या संतांनी भक्तीच्या विचारांनी आपली राष्ट्रीय चेतनेला नवीन ऊर्जा दिली. गुरुनानक, कबीर, तुलसीदास, सूरदास, तुकाराम, एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी आपल्या राष्ट्रीय चेतनेला मौलिक विचारांनी प्राण ओतले. या आंदोलनाने भेदभावाचे जाळे तोडले. समाजाला एकतेच्या सूत्रात जोडले. स्वामी विवेकानंदांनी निराशात असलेल्या समाजाला जागं केलं. त्यांना त्यांच्या स्वरुपाची आठवण करून दिली. त्यांच्यातील आत्मसन्मान जागवलं. त्यांनी राष्ट्रीय चेतना विझू दिली नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
“गुलामीच्या अखेरच्या काळात हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी त्याला नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं. आज आपण पाहतोय, राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे विचार बीज १०० वर्षापूर्वी पेरलं. ते महान वटवृक्ष बनून जगासमोर आहे. सिद्धांत आणि आदर्शाने या वटवृक्षाला उंची दिली आहे. कोट्यवधी स्वयंसेवक हे त्याच्या फांद्या आहेत. हे साधारण वटवृक्ष नाही. संघ भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षय वट आहे. हा अक्षय वट आज भारताच्या संस्कृतीला आपल्या राष्ट्राच्या चेतनेला निरंतर ऊर्जावान बनवत आहे. विदर्भातील महान संत गुलाबराव महाराज यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं. तरीही त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलं. दिसत नसतानाही त्यांनी एवढी पुस्तकं कशी लिहिली. त्यांच्याकडे नेत्र नव्हते. पण दृष्टी होती. ही दृष्टी बोधातून येते. विवेकातून प्रकट होते. ही दृष्टी व्यक्तीसोबत समाजाला शक्ती देते. आपला संघही असा संस्कार यज्ञ आहे. जो अंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टीसाठी आपण माधव नेत्रालयला पाहतो आणि अंतरदृष्टीने संघाला सेवेचा पर्याय दिला आहे”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
“कोणतंही कार्यक्षेत्र असेल सीमावर्ती गाव असेल डोंगराळ भाग असेल, वनक्षेत्र असेल संघाचे स्वयंसेवक निस्वार्थी भावनेने काम करत असतात. कोणी वनवासी क्षेत्रात काम करत आहे. कोणी आदिवासी मुलांना शिकवत आहे. कोणी वंचितांची सेवा करत आहे. तर कोणी शिक्षणाचं काम करत आहे. प्रयागमध्ये नेत्रकुंभात स्वयंसेवकांनी लाखो लोकांची मदत केली. म्हणजे जिथे सेवा कार्य तिथे स्वयंसेवक आहे. आपत्ती आली, पूर आला, भूकंप आला स्वयंसेवक एक शिपायासारखा तिथे पोहोचतो. तो आपली पीडा पाहत नाही. फक्त सेवा भावनेने आपण कामात जोडतो. आपल्या हृदयातच सेवा हे अग्निकुंड आहे”, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले.