‘माझ्या हत्येच्या कटाची पोलिसांना आधीच माहिती होती’, आमदार किणीकरांचा गौप्यस्फोट

| Updated on: Dec 26, 2024 | 7:53 PM

शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. दरम्यान या प्रकरणात आता किणीकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माझ्या हत्येच्या कटाची पोलिसांना आधीच माहिती होती, आमदार किणीकरांचा गौप्यस्फोट
Follow us on

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे आमदार किणीकर हे लातूरला एका कौटुंबीक कार्यक्रमासाठी आले आहेत, तिथेच त्यांना मारण्याचा प्लॅन होता. या प्रकरणात पोलिसांनी आता दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर आमदार बालाजी किणीकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.   माझ्याविरोधातल्या कटाची पोलिसांना आधीच माहिती होती, त्यामुळे 15 दिवसांपासून त्यांची नजर होती असा गौप्यस्फोट किणीकर यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले किणीकर ? 

माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार मागील १५ दिवसांपासून गुन्हे शाखेची या कट रचणाऱ्यांवर नजर होती, असा गौप्यस्फोट स्वतः आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केला आहे.

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची हत्या करण्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन लोकांना ताब्यात घेतलं असून, अन्य दोन लोकांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तर काही जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सर्वप्रथम डॉ. बालाजी किणीकर यांना एका कार्यकर्त्याकडून याबाबत जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी या कार्यकर्त्याला घेऊन थेट ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मात्र त्या ठिकाणी ‘हा कट आत्ता नव्हे, तर अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि मागील १५ दिवसांपासून आम्ही या कट रचणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहोत’, अशी माहिती पोलिसांनीच आपल्याला दिली, असं बालाजी किणीकर यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य दिशेने सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत. जे काही पुढे येईल, ते सर्वांना समजेलच, असं बालाजी किणीकर यांनी म्हटलं आहे. अंबरनाथचा रक्तरंजित इतिहास पाहता एखाद्या कार्यकर्त्याचीही हत्या होऊ शकते, अशीही भीती देखील बालाजी किणीकर यांनी व्यक्त केली असून, या विरोधात अंबरनाथ बंद ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.