कोल्हापूर : महाराष्ट्रात एकीकडे विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन (MLC Election Result) राजकीय घडामोडींना वेग आला असताना कोल्हापुरातून (Kolhapur) एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेची (Kolhapur District Bank) दोन दिवसांपासून ईडीकडून (ED) झाडाझडती सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीने जिल्हा बँकेतील पाच कर्मचारी ताब्यात घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे ईडीकडून काल हसन मुश्रीफ यांच्या बँक खात्याशी संबंधित चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून जिल्हा बँकेत दोन वेळा धाड टाकण्यात आलीय. ईडीकडून आजही बँक कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आलीय. त्यानंतर ईडीने जिल्हा बँकेच्या पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं.
ईडी अधिकाऱ्यांच्या या कारवाईवर एका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही सांगितलं उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या चौकशीसाठी कर्मचारी उपस्थित राहतील. मानवतावादी दृष्टीकोनातून तुम्ही या कर्मचाऱ्यांना घरी जायला, विश्राम करायला परवानगी द्या. हे कर्मचारी उद्या चौकशीसाठी हजर राहतील”, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.
“ईडीचे अधिकारी म्हणाले, समन्स आले आहेत. त्यांनी आज हजर झालं पाहिजे. हा नियम आहे. आम्ही त्यांना सांगितलं, साहेब समन्स पाठवलेलं बदलता येतं. परत पाठवा आणि दुरुस्ती करुन आणा. पण हे सुद्धा ऐकायची त्यांची तयारी नाही”, असं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
“ईडी ही सरकारी यंत्रणा आहे. ते चौकशी करण्यासाठी आले आहेत. आम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत. जे कर्मचारी चौकशीसाठी मुंबईला जात आहेत ते ताणतणावात आहेत. या कर्मचाऱ्यांना कुठलाही धोका निर्माण झाला तर संबंधित अधिकाऱ्यांवर खटला दाखल केल्याशिवाय संघटना थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा आम्ही देतोय”, असं कर्मचारी म्हणाले.
हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. ईडी अधिकाऱ्यांनी त्यादिवशी तब्बल अकरा तास मुश्रीफांच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. ईडी अधिकारी त्यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे घरातून घेऊन गेल्याची माहिती समोर आली होती.
ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित आणखी काही ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेतही धाड टाकली. या धाडीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर थेट पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय.