बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकारानं राज्यभरात खळबळ उडाली. संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 23 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र तरी देखील या हत्याप्रकरणातील काही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. या प्रकरणातील तीन आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले वय 26, कृष्णा शामराव आंधळे वय 30 वर्ष, सुधीर ज्ञानोबा सांगळे वय 23 वर्ष हे अद्यापही फरार आहेत. त्यामुळे आता राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या तीन आरोपींची अटक झाल्यास पोलिसांच्या हाती या प्रकरणात महत्त्वाची माहिती लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता पोलिसांकडून या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांना फरार घोषीत करण्यात आलं आहे. या आरोपींची माहिती देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, तसेच बक्षीसही देण्यात येईल असं पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
प्रसिद्धीपत्रकात नेमकं काय म्हटलं?
पो. स्टे. केज ( जि. बीड) गुरनं 637/2024 कलम 103(2), 140 (2), 126, 118 (1), 34 (4), 34(4), 324 (4) (5), 189(2), 190 भारतीय न्याय संहितामध्ये वरील छायाचित्रामध्ये दर्शविलेल्या प्रमाणे आरोपी निष्पन्न असून ते खुना सारखा गंभीर गुन्हा केल्यापासून फरार आहेत. त्यांना पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलीस दलातर्फे चालू आहेत. नागरिकांना अवाहन करण्यात येते की, वरील आरोपीतांचे ठाव ठिकाण्याची कोणास माहिती किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास त्यांनी खालील नमुद नंबरवर संपर्क साधून आरोपीची माहिती कळवावी, माहिती देणाराचे नाव अत्यंत गोपनिय ठेवण्यात येईल व योग्य ते बक्षिस देण्यात येईल. असं या पत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे या प्रकरणात वाल्मिकी कराडवर देखील आरोप करण्यात येत होते. तो देखील फरार होता. मात्र घटनेच्या 22 व्या दिवशी तो पुण्यात सीआयडीला शरण आला. या हत्याकांडातील काही आरोपींना अटक करण्यात आलं आहे, तर काही आरोपी अजूनही फरार आहेत.