मुंबई : अवघ्या काही तासात पोलीस पदोन्नती (Police promotion order) आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. बुधवारी याबाबतचा आदेश जारी करण्यात आला होता. तो काही तासातच मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे गृहखात्याचा (Maharashtra Home Department) अजब कारभार उघडा पडलाय. बुधवारी (20 एप्रिल) रात्री गृह खात्याने काढलेल्या पदोन्नतीच्या आदेशाला आज (गुरुवारी, 21 एप्रिल) सकाळी स्थगिती दिली. मुंबई आणि ठाणे मधील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आदेशाला स्थगिती (Stay order) देण्यात आली आहे. पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. या पाच जणांमध्ये राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले आणि दत्तात्रय शिंदे यांचं नाव आहे. या पाचही जणांना देण्यात आलेली पदोन्नती पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अवघ्या काही तासांच्या आत पदोन्नतीचा निर्णय का स्थगित करण्यात आला, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, बदलीचा आदेश आहे, तसाच ठेवण्यात आला आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
बदली करण्यात आलेल्यांची नावं आणि त्यांना देण्यात आलेली पदोन्नती काय होती?, यावरही एक नजर टाकुयात…
राज्यातील मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश बुधवारी देण्यात आला होता. त्यात अनेक दिग्गज अधिकाऱ्यांची नावं होती. मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पिंपरी चिंडवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली होती. हा बदली आदेश तसाच कायम ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी काही दिवसांपूर्वीच बदलीची मागणी केली होती. घरगुती कारणांमुळे बदली करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार आता त्यांची बदली करण्यात आली. नाशिक पोलीस आयुक्त आता दीपक पांडेय यांच्या यागी जयंत नाईकनवरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचेपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता अंकुश शिंदे हे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील. तर कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक VIP सुरक्षा, मुंबई इथं बदली करण्यात आली आहे.