चैतन्या गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक / 14 ऑगस्ट 2023 : सिग्नलवर नियम मोडणाऱ्या बेशिस्ट वाहन चालकांवर आता नाशिक पोलिसांचा स्पेशल वॉच असणार आहे. नाशिक शहरातील सिग्नलवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यातून वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. कमांड आणि कंट्रोल रूममधून बेशिस्त वाहनचालकांना सूचना देण्यात येत आहे. नियम मोडणाऱ्यांना थेट सिग्नलवर लावलेल्या माईकमधून पोलीस सूचना देत आहेत. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात ट्रॅफिक कंट्रोल रूम सुरू झाली असून, शहरातील 40 सिग्नलवरील सीसीटिव्ही फुटेज तिथे दिसते. ‘ट्रीपल सीट वाहन चालवू नका’, ‘हेल्मेट वापरा’, ‘विरुद्ध दिशेने येऊ नका’ अशा प्रकारच्या सूचना पोलीस माईकमधून देत आहेत. येत्या काही दिवसांत सीसीटिव्हीद्वारे ई-चलन कारवाई देखील सुरू होणार आहे.
सिग्नलवरील सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट दिसावे यासाठी पोलीस आयुक्तालयातील कमांड कंट्रोल रुममध्ये 6 बाय 4 फूटाची एलसीडी लावण्यात आली आहे. तेथे पाहून पोलीस बेशिस्त वाहन चालकांना सूचना देत आहेत. पोलिसांकडून थेट नाव पुकारण्यात येत असलेल्या वाहन चालकांवर वचक बसत आहे आणि चालक शिस्तीत वाहन चालवत आहेत.
नाशिकमध्ये स्मार्टसिटी अंतर्गत 800 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यापैकी 526 कॅमेरे पोलिसांसाठी असून, या कॅमेऱ्यांद्वारे पोलीस वाहनचालकांवर नजर ठेवत आहेत. यासाठी महिला अंमलदारांना स्मार्ट सिटी आणि आयुक्तालयाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. नाशिकमधील कुंभमेळ्यादरम्यान नजर ठेवण्यासाठी या सीसीटीव्हीचा वापर करण्यात येणार आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेशिस्ट वाहनचालक वचक बसण्यास मदत होत आहे.