खेड : उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये सभा घेतल्यानंतर शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी १९ मार्च खेडमध्ये जाहीर सभा घेऊन व्याजासह हिशेब चुकता करणार असल्याची घोषणा केली. त्याला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने चांगलेच उत्तर देत कदम यांच्यावर खरपूस टीका केली आहे. हिशेब चुकता करणार आहे. व्याजासह देणार आहे. काय व्याज देणार आहे ? नेमकं काय करणार आहे ? सभा घेऊन काय शिव्या देणार आहे ? आज शिमगा आहे. होम पेटणार आहे. काय करायचे ते आम्ही काल केले आहे, असा टोलाही या नेत्याने लगावला आहे.
उद्धव ठाकरे गटात काल राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी प्रवेश केला. त्यांनतर आज त्यांनी माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या खेड येथील घरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी काल सभेत कुणाचेही नाव घेतले नाही. मार्च महिन्यात सभा घेणार हे फेब्रुवारी महिन्यातच ठरले होते. मात्र, रामदास कदम हे तेव्हापासून ओरडत होते. आता ते सभा घेणार म्हणजे काय करणार ? शिव्या देणार. आम्हीही गुरंढोरं सांभाळली आहेत. त्यामुळे आमच्याकडून जे काही येईल ते ऐकत बस. काही तरी चांगले कर. तुमचे व्हिजन काय आहे ? कोयनेचे पाणी देणार आहे ? काय काय आणणार आहे ते लोकांना कळू दे, असा टोला त्यांनी लगावला.
रामदास कदम यांनी फार काही सांगू नये. माझ्याइतका त्यांना जवळून कुणी ओळखत नसेल. भरणा नाक्यावर बोर्ड लावला ‘देवमाणूस’, हा देवमाणूस नाही तर भूत आहे. त्याच्या बॅनरखाली एक भिकारी सावली म्हणून बसला होता. पन्नास खोके घेतले म्हणून डोळे लावून भिकारी बसला आहे अशी ह्या भुताच्या फोटोची फार चर्चा चालली आहे, असे ते म्हणाले.
ज्या शिवसेनाप्रमुखांमुळे रिक्षावाला आमदार झाला. दारू विकणारा रामदास कदम याला एवढी पदे मिळाली. आणखी काय द्यायला पाहिजे होते ? पर्यावरण मंत्री म्हणून असे काय काम केले ते आम्हाला माहित नाही का ? या कंपनीला नोटीस दे आणि पैसे घे. त्या कंपनीला नोटीस दे, पैसे घे. तिथे पैसे घेऊन निवडणूक जिंकल्या, असा आरोप सदानंद कदम यांनी केला.
उदय सामंत आणि योगेश कदम यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. तुम्हाला एबी फॉर्म देण्यात आला तो कुणाचा होता ? तो एबी फॉर्म फाडा. उद्या राजीनामे द्या आणि निवडणूक घ्या. तुम्ही निवडून आलात तर पुन्हा निवडणूक लढणार नाही. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली पण त्यांनी निवडणूक लढण्याची हिंमत दाखविली. पण, ती हिंमत तुमच्यात नाही.
तालुकाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य तुमच्यासोबत राहिले नाहीत. कालच्या सभेला आम्ही भाड्याने माणसे आणली नाहीत. तुझ्या गावातील लोक म्हणाले आतापर्यंत शिवसेना म्हणून आम्ही तुला मदत केली. शिवसेना सोडून तू गेला आम्ही गेलो नाही. मध्येच हा भाजपमध्ये जाणार होता. इथे तिथे नाचशील पण आम्ही तुझ्यासोबत नाचणार नाही, असे गाववाल्यांनीच त्याला सांगितले.
दापोलीच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलला. तेव्हा लोकांच्या प्रचंड शिव्या खाल्ल्या. आता तर लोक जोड्याने मारतील. आप्पा कदम, शिवाजी कदम हे रामदास कदम यांचे सख्खे बंधू आमच्यासोबत आले आहेत.
गावातली लोक, घरातील लोक त्याच्यासोबत नाहीत. दुसऱ्याचे घर फुटले की याला असुरी आनंद होतो. स्वतःचे भाऊ विरोधात गेले. मरताना चांगले मरायचे नाहीत हे लोक अशा शब्दात संजय कदम यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच आमची पुढची सभा ही उत्तर सभा असेल असा इशाराही त्यांनी दिला.