अहमदनगरः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्यजित तांबे यांच्याबाबत फडणवीस यांनी सूचक विधान केलं होतं. त्यावरून अजित पवार यांनी थोरात यांना सतर्कही केलं होतं. मात्र तरीही बाळासाहेब थोरात गाफिल राहिले का? नगरचं राजकारण कोणकोणत्या नात्यांगोत्यांमध्ये अडकलं आहे. कट्टर काँग्रेस समर्थक असलेले तांबे कशामुळे रुसले याकडे आता साऱ्यांचे ल७ लागून राहिले आहे.
राहुल गांधी यांच्याशी घनिष्ठ संबंध आणि काँग्रेसचे कडवट समर्थक म्हणवणाऱ्या तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
गांधी आणि तांबे यांचा संपर्क इतका चांगला होता की नगर दौऱ्यावेळी राहुल गांधी यांनी तांबे यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिली होती. मात्र आता तांबे पिता-पुत्राच्या निलंबनाचं फर्मान थेट हायकमांडकडूनच निघालं आहे.
१5 तारखेला डॉ. सुधीर तांबे यांना आणि 16 तारखेला त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे दोन्ही नेते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आणि भाचे आहेत. त्यामुळे इतक्या गदारोळानंतरही बाळासाहेब थोरात अद्याप माध्यमांसमोर आले नाहीत.
मात्र उमेदवारी गदारोळात काँग्रेस पक्षात भाच्यानं मामाची गोची केल्याची चर्चा रंगली आहे. कारण मेहुणे आणि भाच्याच्या बंडावर थोरात मौन असल्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
नाशिक पदवीधरचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबेच आहेत. म्हणजे थोरात यांचे मेहुणे. यावेळी सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे तिकीटासाठी इच्छूक होते.
मात्र त्यांच्याऐवजी काँग्रेसनं पुन्हा सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली. सत्यजित तांबे यांची अनेक वर्षांपासून सक्रीय राजकारणात येण्याची धडपड सुरु आहे.
तर दुसरीकडे संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री थोरात सुद्धा राजकारणाचे धडे गिरवू लागली आहे.असं म्हणतात की मामा-भाच्यात पडलेल्या या ठिणगीचं मूळ संगमनेरच्या मतदारसंघातच आहे.
एका बाजूला थोरातांची कन्या संगमनेरमध्ये सक्रीय होते आहे तर दुसरीकडे भाचा सत्यजित तांबे सुद्धा संगमनेरसाठी फिल्डिंग लावत असल्यामुळेच हा वाद उफाळून आल्याचे बोललं जातं आहे.
नगर जिल्ह्यातल्या अनेक राजकीय घराण्यांनी सर्व पक्ष व्यापले आहेत. नगरचं राजकारण नात्यागोत्यांमध्ये कसं गुरफटलं हे पुढील नात्यागोत्याच्या राजकारणावरून लक्षात येतं.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेल्या भाऊसाहेब थोरात यांचे पुत्र म्हणजे बाळासाहेब थोरात. त्यांचा पक्ष काँग्रेस, तर थोरात यांच्या बहीण दुर्गा तांबे या संगमनेरच्या सलग 10 वर्षे नगराध्यक्ष राहिल्या आहेत.
10 वर्षे त्यांचे पती म्हणजे बाळासाहेब थोरातांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे हे विधानपरिषदेवर आमदार आहेत. तर त्यांचा पक्ष काँग्रेस आहे मात्र सद्या निलंबित झाले आहेत.
तांबे यांचे पुत्र म्हणजे बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबेंनी युवा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं आहे. तांबे कुटुंबीय मूळ काँग्रेसचं असलं तरी सध्या भाजपसोबत त्यांची जवळीक वाढली आहे.
पाथर्डीचे दिवंगत माजी आमदार राजीव राजळे हे सुद्धा बाळासाहेब थोरात यांचेच भाचे होते. राजीव राजळे आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी आणि सध्या त्यांची पत्नी म्हणजे बाळासाहेब थोरातांची भाचेसून मोनिका राजळे या शेवगाव-पाथर्डीतून भाजपच्या आमदार आहेत.
थोरात यांचे अजून एक भाचे राहुल हे नगरच्या जिल्हा परिषदेवर सदस्य आहेत. बाळासाहेब थोरातांची एक भाची या शंकरराव गडाख यांच्या पत्नी आहेत.
तर शंकरराव गडाख सध्या ठाकरे गटात आहेत. नात्यानं शंकरराव गडाख हे थोरातांचे भाचेजावई लागतात. बाळासाहेब थोरातांच्या तिसऱ्या बहिणीचं लग्न अरूण कडू यांच्याशी झालं आहे.
अरुण कडू हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. नगर जिल्हा परिषदेचं अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. आणि सध्या ते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.
म्हणजे थोडक्यात बाळासाहेब थोरात आणि त्यांचा भाचे परिवार हा काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप-ठाकरे गट अशा चारही पक्षात आहे. मनसेला नगरमध्ये फार वाव मिळाला नाही., नाहीतर कदाचित मनसेलाही नगरच्या नात्यागोत्यानं व्यापलं असतं….