वादग्रस्त आयएएस अधिकारी पूदा खेडकर हिच प्रकरणं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात चांगलंच गाजलंय. तिला बडतर्फ करण्यात आलं आहे. मात्र तिचे वडील दिलीप खेडकर पुन्हा चर्चेत आले आहेत, त्याचं कारण म्हणजे त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. दिलीप खेडकर हे अहमदनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी नुकताच त्यांचा नामांकन अर्ज भरला आहे, मात्र त्यातील एका माहितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिलीप खेडकर यांनी त्यांच्या नामांकन अर्जात आपण घटस्फोटित असल्याचे नमूद केलं आहे.
मात्र अवघ्या काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांन जो अर्ज भरला होता, त्यातील माहिती आणि आत्ताची माहिती पूर्णपणे विरुद्ध आहे. दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती आणि तेव्हा त्यांनी नामांकन अर्ज भराता त्यात मनोरमा खेडक यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला होता.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या रिंगणात उडी
काही महिन्यांपूर्वी खेडकर यांनी लोकसभा निवडमूक लढवली आणि आता ते विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलीप खेडकर यांनी अहमदनगर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा दारूण पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर यांचा उल्लेख त्यांची पत्नी असा केला होता. तसेच त्यांच्या संयुक्त मालकीच्या मालमत्तेचा तपशील दिला होता. त्यांनी आपल्या कुटुंबाचे वर्णन “अविभाजित हिंदू कुटुंब” असे केले.
एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे, त्यांच्या रिपोर्टनुसार, दिलीप आणि मनोरमा खेडकर यांनी 2009 मध्ये पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आणि 25 जून 2010 रोजी घटस्फोट अंतिम झाला. घटस्फोट होऊनही पुण्यातील बाणेर भागात मनोरमा खेडकर यांच्या मालकीच्या बंगल्यात दोघेही पती-पत्नी एकत्र राहत होते.
पूजा खेजकर बडतर्फ
दरम्यान केंद्र सरकारने IAS (प्रोबेशनरी) नियम, 1954 च्या नियम 12 अंतर्गत बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिच्यावर कारवाई केली होती. आणि तिला भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तत्काळ प्रभावाने कार्यमुक्त केलं. यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याप्रकरणी सरकारने पूजाविरोधात ही कारवाई केली आहे. यापूर्वी, केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 31 जुलै रोजी त्यांची उमेदवारी रद्द केली होती. तिला भविष्यातही परीक्षा देता येणार नाहीत.
पूजा खेडकर ही 2020-21 मध्ये OBC कोट्यातील परीक्षेत ‘पूजा दिलीपराव खेडकर’ या नावाने बसली होती. 2021-22 मध्ये सर्व अटेम्प्ट झाल्यावर पूजा हिने OBC आणि PWBD (अपंग व्यक्ती) कोट्याअंतर्गत परीक्षेला दिली. तेव्हा तिने ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’ हे नाव वापरले. पूजाने अखिल भारतीय स्तरावर 821 वा क्रमांक पटकावला होता. तिच्या उमेदवारीच्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी 11 जुलै रोजी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आणि 24 जुलै रोजी अहवाल सादर करण्यात आला. समितीचा अहवाल लक्षात घेऊन सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियम 1954 च्या नियम 12 मधील तरतुदींनुसार चौकशी केली.