पत्ता कापताच पूनम महाजन यांचं ट्विट; म्हणाल्या, माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण…

| Updated on: Apr 28, 2024 | 12:14 PM

भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. गेल्या दहा वर्षापासून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करूनही त्यांना भाजपने तिकीट दिलेलं नाही. भाजपने त्यांच्या ऐवजी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं आहे. पूनम महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.

पत्ता कापताच पूनम महाजन यांचं ट्विट; म्हणाल्या, माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण...
ujjwal nikam
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन यांचा पत्ता कापण्यात आला आहे. पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. असं असतानाही पक्षाने त्यांचा पत्ता कापला आहे. त्यांच्या जागी प्रसिद्ध सरकारी वकील उज्जवल निकम यांना तिकीट दिलं आहे. तिकीट मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी रितसर भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. पूनम महाजन यांनाच पक्ष तिकीट देईल असं सांगितलं जात होतं. पण त्यांचा पत्ता कापण्यात आल्याने त्या काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर पूनम महाजन यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पूनम यांचं ट्विट काय?

मला गेल्या दहा वर्षापासून एक खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी देण्यात आली. त्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. मला एक खासदार म्हणून नव्हे तर एक मुलगी म्हणून स्नेह दिल्याबद्दल मतदारसंघातील कुटुंबा समान जनतेची मी सदैव ऋणी राहील. आणि हे नातं कायम राहील अशी आशा आहे. माझे आदर्श, माझे वडील स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी मला, राष्ट्र पहिलं, नंतर आपण ही शिकवण दिली आहे. आजीवन याच मार्गावर मी चालेल अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण सदैव देश सेवेसाठी समर्पित राहील, असं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.

मी नवखा नाही

दरम्यान, उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझा जन्म हनुमान जयंतीच्या दिवशी झाला. मी रामाचा भक्त समजतो. शुभ कामाला सुरुवात करण्याआगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी देशाची प्रतिमा जगात उमटवली आहे. माझ्यावर जी नवीन जबाबदारी देण्यात आली, ती निभावण्यासाठी बाप्पा बळ देईल. राजकारणाचा अनुभव नसला तरी मी नवखा नाही, असं उज्ज्वल निकम म्हणाले.

 

भाजपमध्ये प्रवेश

उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी विलेपार्ले येथील भाजपचं कार्यालय गाठलं. यावेळी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत उज्ज्वल निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उज्ज्वल निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विलेपार्ले परिसरात त्यांचे बॅनर्स झळकले. या बॅनर्सवर निकम यांचा फोटो आणि कमळ चिन्ह होतं.

पूनमताई नव्या भूमिकेत दिसतील

उज्ज्वल निकम यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर आशिष शेलार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. उज्वल निकम यांना सच्चा मुंबईकर म्हणतो कारण याकूब मेमन याला फासावर चढवायचं काम हे पोलिसांसोबत उज्वल निकम यांनी केलं आहे. कसाबला फासावर चढवण्याच काम केलं, पण पाकिस्तानचे आतंकवादी आहेत हे सिद्ध करायच होत तेही काम त्यांनी केलं. संपूर्ण जग बघत होत की भारत कसाबला कसं फासावर चढवणार? पण निकम यांनी खटला लढत कसाबला फासावर चढवलं. जर मनात ठरवलं असतं तर त्यांनी खासगी वकिली करून बक्कळ पैसा कमवला असता पण अस केलं नाही, असं सांगतानाच पूनमताई महाजन यांच 10 वर्षात मोठं काम आहे. पूनमताई लवकरचं नवीन रोलमध्ये या मतदार संघांचे काम करतील. कोणी काही गॉसिप करू नका, असं आशिष शेलार म्हणाले.