नाशिक : प्रत्येकाला आपला वाढदिवस ( Birthday ) आयुष्यातील महत्वाचा दिवस वाटतो. त्यादिवशी त्याचं सेलिब्रेशन कसं करायचं याची आवड प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्यानुसार कुणी जल्लोषात साजरा करतं तर कुणी आधारश्रमात साजरा करत असतं. गरिबांना मदत करून काहीजण वाढदिवस साजरा करत असतात. प्रत्येकाची वाढदिवस साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. दरम्यान नाशिकमध्ये ( Nashik News ) एका आजीने वयाच्या 87 व्या वर्षी साजरा केलेला वाढदिवस चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल पाच लाखांचा धनादेश या आजीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जिल्हा सैनिक कल्याण मंडळाला दिला आहे. देशाच्या प्रती असलेली भावना आजीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी व्यक्त केली आहे.
देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांना आजीने ही पाच लाखांची रक्कम दिली आहे. आपला वाढदिवस साजरा करत असतांना आजीने देशाप्रती आपली भावना अनोख्या पद्धतीने व्यक्त केली आहे.
नाशिकच्या लघुउद्योग भारती संस्थेचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी यांच्या मातोश्री सुशीला कुलकर्णी यांनी हा वाढदिवस साजरा केला आहे. खरंतर वाढदिवस साजरा करण्या ऐवजी सैनिकांना मदत करायची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा सैनिक मंडळाला पाच लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.
सुशीला कुलकर्णी यांना यापूर्वी दोनदा गंभीर आजार झाला होता. त्यातून त्या बऱ्या झाल्या आहेत. अनेक संकटांचा सामना करून सुशीला आजी बचावल्या आहेत. त्यामुळे आपला जीव हा सैनिकांना मदत करण्यासाठी परमेश्वराने वाचवले असल्याची त्यांची भावना आहे.
त्याच अनुषंगाने कुलकर्णी यांनी जिल्हा सैनिक मंडळात जाऊन संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या मातोश्रीच्या वाढदिवसाला पाच लाखांचा धनादेश देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निवृत्त कमांडर विनायक आगाशे आणि ले. कमांडर ओंकार कापले यांच्याकडे हा धनादेश दिला आहे.
जिल्हा सैनिक कल्याण मंडाळाचे ले. कमांडर ओंकार कापले यांनी यावेळेला सुशीला कुलकर्णी यांना आश्वासित केले आहे, तुम्ही दिलेल्या रक्कमेचा विनियोग सैनिकांबरोबर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.
देशाच्या रक्षणासाठी सैनिक आपल्या जिवाची बाजी लावून सेवा करत असतो. त्यावेळी तो आपल्या कुटुंबापासून दूर असतो. त्यांच्यामुळे आपण सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली जाते त्यामुळे ही मदत करण्याची भावना सुशीला कुलकर्णी यांनी आल्याचे म्हंटले आहे. एकूणच कुलकर्णी यांचा हा पुढाकार अनेकांचा अभिमानाने ऊर भरवून देणारा आहे.