नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर अजितदादा गटाची पहिली प्रतिक्रिया; प्रफुल्ल पटेल म्हणाले, नवाबभाई…

| Updated on: Dec 08, 2023 | 1:39 PM

चार राज्याचा निकाल ज्या पद्धताने लागला त्यामुळे आमचे विरोधक चीतपट झाले आहेत. या पराभवामुळे त्यांनी हताश होऊन दुसरा मुद्दा नसल्याने गैरमुद्दे उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. लोकांची सहानुभूती की आम्हाला बदनाम करण्यासाठी हे कळेलच असं सांगतानाच आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. आम्ही सेक्युलर आहोत. त्यामुळे कोण काय बोललं यापेक्षा आम्हाला कसं पुढे जायचं आहे. ते आम्ही पाहू, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर अजितदादा गटाची पहिली प्रतिक्रिया; प्रफुल्ल पटेल म्हणाले, नवाबभाई...
praful patel
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

नागपूर | 8 डिसेंबर 2023 : नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून अजितदादा गट महायुतीत एकाकी पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना सोबत घेण्यास विरध केला आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे अजितदादा गट या मुद्द्यावर एकाकी पडला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला आहे. नवाब मलिक यांनी भूमिका मांडल्यावरच बोलू असं म्हणत अजितदादा यांनी स्पष्ट भूमिका मांडण्यास नकार दिला आहे. तर, या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या मुद्दयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जे काही घडलं ते सर्वांना माहीत आहे. मधल्या काळात राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडी झाल्या. त्यावेळी मलिक कुणाबरोबर नव्हते. कुणाशाही त्यांचा संबंध नव्हता. त्यांचा जामीन झाल्यावर आम्ही त्यांना भेटलो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं आमचं कर्तव्य होतं. ते आमदार आहेत. ते आल्यावर जुने सहकारी एकमेकांना भेटतात बोलतात. स्वाभाविक आहे. आम्ही नवाब मलिकांची भूमिका काय आहे? त्यांनी काय करायचं? त्यांची उद्याची वाटचाल काय असेल? यावर चर्चा केली नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

नंतर पाहू

नवाब मलिक हे वैद्यकीय जामिनावर आहेत. आम्हाला अजिबात या विषयावर त्यांच्याशी चर्चा करायची नाही. विधानसभेत ते कुठे बसले हे महत्त्वाचे आहे. विधानसभेत बसण्याचा त्यांच्याकडे अधिकार आहे. म्हणून ते आले. ते आल्यावर कुणाला भेटले म्हणजे आम्ही त्यांना पुरस्कृत करतो किंवा अन्य कोणी करतो असं म्हणणं चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीस यांननी काही पत्र लिहिलं असेल. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. नवाब मलिक आमच्याकडे की दुसरीकडे हा प्रश्न निर्माण केला नाही. जेव्हा होईल तेव्हा पाहू, असं पटेल यांनी सांगितलं.

उगाच घोळ घातला जातोय

आम्ही मलिकांशी राजकीय चर्चाच केली नाही. फक्त सदिच्छा भेट घेतली होती. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने त्यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीत मलिक यांची भूमिका आज आणि उद्या काय असेल यावर भाष्य करू शकत नाही. फक्त मलिक यांची प्रकृती चांगली राहावी हीच प्रार्थना आहे. नवाब मलिक हे जामिनावर आहेत. आम्ही त्यांना अडचणीत टाकू शकत नाही. कालपासून उगीचच घोळ निर्माण केला जात आहे, असंही ते म्हणाले.

मलिक जुने सहकारी

नवाब भाई आमचे जुने सहकारी आहेत. त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही. निवडणूक आयोगात आम्ही मलिकांबाबत कोणताही कागद दिला नाही. प्रतिज्ञापत्रही दिलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपचंच सरकार येणार

प्रफुल्ल पटेल यांनीही दाऊदच्या लोकांशी व्यवहार केला होता, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्याबद्दल ज्यांना जाण नाही. त्यांना उत्तर द्यायचं नाही. माझ्याबद्दल शरद पवार यांनीच उत्तर दिलं आहे. रेकॉर्ड काढा आणि तेच चालवा. नाना पटोले काय किंवा इतर लोक बोलणारच. ते हताश झालेत. उद्याचा दिवस त्यांचा हताशाचा असेल. देशाची दिशा ठरली आहे. भाजपचं सरकार येणार आहे. महाराष्ट्रातही महायुतीचं सरकार येणार आहे, असा दावाही त्यांनी केला.