मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेला आज 19 दिवस झाले आहेत, मात्र अजूनही या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही, त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे, हे प्रकरण आमदार सुरेश धस यांनी चांगलंच उचलून धरलं, या प्रकरणात बोलताना सुरेश धस यांच्याकडून सातत्यानं आकावर आरोप करण्यात येत आहेत, मात्र हे आका कोण याचा खुलासा त्यांनी केलेला नाही.
त्यांनी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. या प्रकरणावर बोलत असतानाच त्यांनी तीन अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख केला होता. यामध्ये एक नाव प्राजक्ता माळी यांचंं देखील आहे. त्यानंतर आज प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं आहे. सोबतच त्यांनी करुणा शर्मा यांना देखील आवाहन केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या प्राजक्ता माळी?
तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं. त्यांनी कुत्सितपणे टिप्पणी करून या गोष्टीचा प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी गैरवापर केला आहे. हे वागणं महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही. ही निंदणीय बाब असल्याचं प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की माझी आई दीड महिना झोपली नाही. माझ्या भावाने सोशल मीडियाचे सर्व अकाऊंट डिलीट केले. समाजात अशी प्रतिमा डागाळलं जाणं, एका मुलीची आणि त्यातही फिल्म क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींची हा किती गंभीर प्रकार आहे, हे तुम्ही समजून शकत नाहीत. तुम्ही या गोष्टींचं गाभीर्य ठेवलं पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. पुरावा असल्याशिवाय बेसलेस बातमी देऊ नये असे आदेश द्यावेत, असं प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना करुणा शर्मा यांना देखील आवाहन केलं आहे. मी करुणा ताईंनाही विनंती करू इच्छिते. तुम्ही महिला आहात. महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुष प्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या पाठी नाही राहिल्या तर कसं होणार. माझ्याबाबतची जी माहिती मिळाली ती चुकीची आहे. तुमचा स्त्रोत चुकीचा आहे. कोणत्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय करुणा ताई तुम्ही असं करणार नाही, अशी विनंती करते, असं प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे.