नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी

| Updated on: Jul 16, 2024 | 5:03 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनानंतर सरकारकडून कुणबी नोंदींचा शोध घेतला जातोय. सरकारकडून नेमण्यात आलेली समिती कुणबी नोंदी शोधण्यात व्यस्त आहे. या नोंदी शोधल्यानंतर संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे. पण सरकारकडून स्वत:हून ज्यांना प्रमाणपत्र दिले जात आहेत त्यांच्या नोंदी रद्द कराव्यात, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी
प्रकाश आंबेडकर
Follow us on

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत मोठी मागणी केली. नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. “नवीन कुणबीप्रमाणपत्र तपासले गेले नाहीत. ज्यांना दिले त्यांनी अर्ज केलेला नाही, तुम्ही स्वत:हून सर्च केलं आहे. ज्यांनी घेतलं नाही, त्यांनी ते सोडून दिलं आहे ,असं होऊ शकतं. तुम्ही आता जे काढलं ते रद्द करा. जे कुणबी आहे, ते अर्ज करतील आणि त्यांना आरक्षण मिळून जाईल. मी जर सर्टिफिकेट मागितलं नसेल तर माझ्या नावाने कसं देणार. मागितलं तर द्या. मी मागितलचं नाही तर माझ्या नावाने कसं देता? तेवढे अर्जच आलेले नाहीत”, असा् दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. याचाच अर्थ ज्यांच्याकडे कुणबी आरक्षणाचे कागदपत्रे आहेत ते प्रशासनाकडे जावून आपलं कुणबी प्रमाणपत्र मिळवून घेतील. पण प्रशासनाकडून स्वत:हून सरसकटपणे कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणं चुकीचं आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मांडली.

प्रकाश आंबेडकर काय-काय म्हणाले?

“राजकीय पक्षांनी या संवेदनशील विषयावर बोललं पाहिजे. दंगल होईपर्यंत वाट पाहू नये. परिस्थिती स्फोटक आहे. एवढं सांगतो. तोडगा काढणारे राजकीय पक्ष आहेत आणि विधानसभा आहे. निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपली पोळी भाजण्याचं काम करत आहे. एनसीपी, काँग्रेस आणि ठाकरे गट आणि भाजप हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहे. म्हणून ते भूमिका टाळत आहेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“राजकीय पक्षांनी भूमिका घेतल्या तर लोकांसमोर परिस्थिती जाते. जे पक्ष भूमिका घेत नाहीत, ते आपल्या बाजूने नाही असं ओबीसींचं मत होत आहे. हे सर्व लोक श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत, असं ओबीसींना वाटतंय. हा धोका आहे. दुसरीकडे जरांगे म्हणत आहेत की, आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कोणतंही सरकार निर्णय घेणार नाही”, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं.

मनोज जरांगे यांचं आंदोलन गरीब मराठ्यांचं आदोनल आहे. ते जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही. त्यांचं आंदोलन कुठे जाईल, कसं जाईल हे सांगता येत नाही. मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. आंदोलनं ही श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झालं पाहिजे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. तसेच “आंदोलन भरकटलंय असं म्हटलं नाही. म्हणणार नाही. पण जरांगे पाटील यांना ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. ते श्रीमंत मराठ्यांसोबत आहेत की, ३१ खासदारांसोबत आहेत की गरीब मराठ्यांसोबत आहेत याचा विचार करावा लागणार आहे”, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

“सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची आहे. ते श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळूच नये असा त्यांचा प्रयत्न आहे. याचा तोडगा मी आता मांडणार नाही. मांडला तर त्याचा खिमा करतील. सत्ता आल्यावर तोडगा देईल. आता भेसळ करण्याचा भाग सुरू आहे. सगे सोयरे ही भेसळ आहे. प्रत्येक पार्टीला पत्र लिहा या दोन विषयावर. जरांगेची मागणी आहे, मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्या आणि सगेसोयऱ्यांबाबतची भूमिका काय हे राजकीय पक्षांना पत्रातून कळवा असं सांगितलं”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.