नाशिक : शिवसेनेवर आमचं लाईन मारण्याचं काम सुरु, व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही होवू शकतं असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. नाशिकमधील पत्रकार परिषदेत हे विधान करून प्रकाश आंबेडकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. याशिवाय शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही हार घालायला तयार आहे. पण त्यांना घेऊन तुम्ही या अशी मुभा उद्धव ठाकरे यांना दिल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीच्या चर्चा सुरू असून प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात याबाबत बैठक झाली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आंबेडकर आणि ठाकरे यांच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी व्हॅलेंटाईन डे पर्यन्त काहीही होऊ शकतं म्हणत आम्ही लाइन मारण्याचं काम सुरू केलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार रतन बनसोडे यांच्या प्रचारासाठी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे.
याशिवाय सध्या पक्ष बाजूला ठेऊन व्यक्तिगत राजकारण सुरू आहे. याला आळा बसला पाहिजे, आम्ही आता स्पर्धेत आहोत. यात काही जण पैसेवाले आहे. दहा दहा कोटी रुपये खर्च करू शकतात असं आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.
पण कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवू, गेल्या चाळीस वर्षापासून मी धनशक्ती विरोधात लढत आहे, अमरावती, नागपूर येथे आमची परिस्थिती चांगली आहे.
नरेंद्र मोदी गावाच्या सरपंचासारखं करत आहे, एकाच कामाचे दोनदा उद्घाटन होत आहे, देशात हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे, पण हा प्रत्येक माणसाचा प्रश्न आहे, त्याला काय वाटते ते.
या अगोदर कार्यक्रम पत्रिकेत सत्ताधारी सोबत विरोधी पक्षाचे देखील नाव असायचे, हे प्रत्येक माणसाने ठरवावे की, ही हुकूमशाही आहे की नाही असा हल्लाबोल भाजपवर आंबेडकर यांनी केला आहे.
अजून आमची शिवसेनासोबत बोलणी सुरू आहे. त्यामुळे काही शब्द देता येणार नाही. आमची फक्त शिवसेनेसोबत एकत्र येण्याची बोलणी सुरू आहे, उद्धव ठाकरे यांचे म्हणणं आहे की, आपण काँगेस आणि राष्ट्रवादीला देखील सोबत घेऊ.
आम्ही उद्धव ठाकरे यांना मुभा दिली आहे की, तुम्ही त्यांना घेऊन या. आम्ही हार घालू. द्धव ठाकरे आणि काँगेस, राष्ट्रवादी यांच्या सोबत बोलणं सुरू आहे. झाल्यावर बघू असेही आंबेडकर यांनी युतीबाबत म्हंटलं आहे.
ते म्हणत आहे की, ओबीसी आणि गरीब मराठा यांचे वकीलपत्र सोडा, त्यांचे म्हणणं आहे की, श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला हात घालू नका, त्यांना घराणेशाही हवी आहे असा टोलाही कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसला आंबेडकर यांनी लगावला आहे.
शिवसेना आणि वंचित यांचे अजून नातं जमलेले नाही, फक्त एकमेकांवर लाईन मारणे सुरू आहे, व्हॅलेंटाईन डे पर्यन्त काहीही होऊ शकतं अशी गुगलीही प्रकाश आंबेडकर यांनी टाकली आहे.