मुंबई । 6 ऑगस्ट 2023 : ऑगस्टमध्ये इंडियाची ( INDIA ) महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला वंचित बहुजन विकास आघाडी जाणार का? यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाष्य केलंय. आम्हाला बोलवायचे की नाही हे उद्धव ठाकरे, सोनिया गांधी किंवा शरद पवार यांनाच विचारा. उद्धव ठाकरे हे संभाजी बिग्रेड यांच्यासोबत मेळावा घेत असतील तर त्यात चुकीचे काय आहे. उद्धव ठाकरे आणि संभाजी बिग्रेड यांची युती आहे. त्यामुळे कोणी कुणासोबत मेळावा घ्यावा हे त्यांचे तेच ठरवतील. हा त्यांचा प्रश्न आहे, असे परखड मत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आबेडकर यांनी व्यक्त केले.
सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी महाराष्ट्रातील सतीची पहिली प्रथा बंद करण्याचे काम औरंगजेब याने केले असे खळबळजनक विधान केलंय. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, याचे उत्तर इतिहासकारांनीच द्यावे. नेमाडे हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी असे विधान केले असेल तर त्यांना काही इतिहास ठाऊक असेल म्हणून त्यांनी तसे मांडले असावे.
औरंगजेब याच्यावरून राज्यात वाद सुरु झाला. मात्र, कुणी वाद केला असा थेट सवाल त्यांनी केला. मी मजारीवर गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शांतता झालेली आहे. त्यामुळे लोक कोणाच्या बाजूने आहेत हे ओळखा. कुणी काही तरी टिम टिम टिमकी वाजवत असतात. ते आरएसएस किंवा भाजपचे लोक आहेत. महाराष्ट्रात कोणाला वाद हवा आहे? असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र, काही बॉम्ब फुटणार आहेत हे मी आधीच सांगितले होते. ते फुटले. आता त्यात काही चार्म राहिलेला नाही. आणखी बॉम्ब फुटो किंवा न फुटो जे सांगितले होते ते घडले असे आंबेडकर यांनी सांगितले.
आज फ्रेंडशिप डे म्हणून एक पोस्ट केली होती. माझे दरवाजे सगळ्यांसाठीच मोकळे आहेत. ज्यांना ज्यांना माझ्यासोबत मैत्री करायची आहे त्यांच्यासाठी माझे दरवाजे मोकळे आहेत. मग ती राजकीय मैत्री असले किंवा वैयक्तिक असेल. भाजप घरी चहा प्यायला आला तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. पण, राजकीय नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.