पुणे : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर शेतकऱ्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. राज्यातील शेतकरी वर्गाचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतांना ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत असतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही असे विधान केले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी वर्गासह विरोधकांनी शिंदे सरकारच्या विरोधात रान पेटवले आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. कृषीमंत्री शेतकऱ्यांची फसवणूक करत असून त्यांच्यावर शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल करावा असे म्हणत हवामान विभागाकडून माहिती घ्या आणि ती माहिती मंत्र्यांना द्या, किती पाऊस पडला अतिवृष्टी झाली का ? याबाबत सविस्तर माहिती घेऊन शिंदे सरकारवर आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे.
राज्यातील विविध भागात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी पाऊस अंदाजापेक्षा अधिक कोसळला आहे.
कृषीमंत्री जनतेची फसवणूक करत आहेत, शेतकऱ्यांनी पुढे यावं आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा असा सल्ला देत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आंबेडकर यांनी टीका केली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे स्वतः राज्यातील विविध भागात पाहून शेतीचे किती नुकसान झाले आहे याची पाहणी करत आहे.
त्यानुसार अब्दुल सत्तार हे पाहणी करत असतांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नाही असा दावा केल्याने रोष वाढवून घेतला होता.
एकूणच ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत असतांना आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना दिलेला चर्चेचा विषय ठरत आहे.