वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा आज सांगलीत पोहोचली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी महत्त्वाचं आवाहन केलं. “ओबीसींच्या डोक्यात खूळ बसली आहे की, हिंदू खत्रे में हैं. पण हे खूळ बाजूला करावे लागेल. हे खूळ भाजपने उभं केलं आहे. भाजप ओबीसींच्या बाजूने का नाही? त्यामुळे हे धर्माचं भूत उभं केलं आहे. या निवडणुकीत आरक्षण वाचायचं की जाऊन द्यायचं, तर स्वतःला मतदान करायचं आहे. एक छगन भुजबळ निर्माण करून चालणार नाही, अनेक भुजबळ उभे करावे लागणार आहेत. 100 ओबीसींचे आमदार निवडून आले पाहिजेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“ओबीसी 57 जागा राखीव आहेत. तर याच्यावर नजर असणार आहे. या निवडणुकीत आरक्षण बचाव हा मुद्दा असणार आहे. पण कुठलीही पार्टी आरक्षण वाचवण्याच्या बाजूने आहे की नाही हे पाहणार आहे. किमान 100 ओबीसींचे उमेदवार निवडून आणणार का? हे पाहावे लागेल. सगेसोयरे कायदा आणायचा यांनी ठरवले तर छगन भुजबळ थांबवू शकत नाहीत. कारण आपले संख्याबळ नाही. त्यामुळे हे सर्व पक्ष ओबीसींच्या विरोधात आहेत. आणि येणाऱ्या निवडणुकीत पक्ष बघू नका, स्वतः कडे बघा, आरक्षण वाचवणाऱ्याकडे बघा”, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
“महाराष्ट्रमध्ये जे वातावरण होत आहे ते थांबवलं पाहिजे आणि ओबीसींना दिलासा द्यायला पाहिजे. आपण यात्रा सुरू केली आहे. जे राजकीय नेतृत्व आहे ते सर्व फसवे आहे. कारण त्यांना आरक्षण नको आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना संविधानातील बाबी लक्षात नसतील. म्हणून ते रेटत आहेत. पण येथे सर्वच पक्षातील राजकीय नेतृत्व आहे. शरद पवार यांनी राजकारणात बरेच वर्ष घालवली आहेत. पण ते काहीच बोलत नाहीत. तुमची आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ते सांगा”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि भाजप यांची भूमिका काय आहे? हे त्यांनी सांगावे. हे त्यांनी सांगितले तर प्रश्न सुटेल. आणि पुढे वाटचाल सुरू होईल. पण मला शंका आहे. हे भूमिका घेणारच नाहीत, असे माझे मत आहे. भूमिका घेतली तर मराठा खूश तर ओबीसींना नाखूश. हे राजकीय नेते ना महाराष्ट्रचे नेते आहेत, हे न भूमिका घेणारे नेते आहेत. उद्धव ठाकरे हे कायस्थ ब्राम्हण. आम्हाला त्याचे काही घेणंदेणं नाही. त्यांचे ते बघून घेतील. त्यामुळे ते भूमिका घेत नाहीत”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
“आरक्षण भिजत ठेवण्याचा काम हे करत आहेत. आता जी विधानं होत आहेत ते चिंताजनक आहे. एक तर आम्हाला द्या, नाहीतर सगळ्यांचं काढून घ्या. तर शरद पवार यांची मुलाखत होती की, येणाऱ्या निवडणुकीमध्ये समाजाचे 225 आमदार असतील. जरांगे पाटील खरा आहे, खोटा आहे? हे कुणीच काय सांगायला तयार नाही. आणि सगळ्यांनीच ठरवले आहे की, आपण मराठा समाजाची बाजू घ्यायची”, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.