काही दिवसांपूर्वी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत. तसेच वाल्मिकी कराड यांच्या अटकेच्या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्व धर्मीयांचा मोर्चा निघाला आहे, हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे. यावेळी बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसाठी मदतीची घोषणा देखील केली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश सोळंके?
धनंजय मुंडे पालकमंत्री होते. त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रिपद भाड्याने दिलं आहे. मग धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रिपद कोणाला भाड्यानं दिलं होतं. धनंजय मुंडे यांनी वाल्मिकी कराडला ताकद दिली. जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत वाल्मिकी कराडला अटक होणार नाही. त्यामुळे जोपर्यंत आरोपीला फासावर लटकवले जात नाहीत, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी प्रकाश सोळंके यांनी केली आहे. तसेच आम्ही देशमुख यांच्या कुटुंबाला चार तारखेला 40 लाख रुपयांची मदत करणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, फोन करून पोलिसांना सांगायचे याला अटक करा. ३०७मध्ये अडकवा, २०७ मध्ये अटक करा. हजारो लोकांवर गुन्हे दाखल केले. परळीत दररोज ३०० हायवा वाळूचा उपसा करतात. कुणाच्या आहेत या हायवा. ज्यांनी वाल्मिकी कराडच्या पाठी शक्ती उभी केली, ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास न्याय मिळणार नाही. जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत मुंडे यांचं मंत्रिपद काढून घ्यावं ही मागणी आहे. आजचा मोर्चा पहिलं पाऊल आहे. न्याय मिळाला नाही तर यापेक्षा मोठं आणि कडक आंदोलन करावं लागणार आहे.
माजलगाव तालुक्यातील सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन ४० लाख रुपयांचा निधी आम्ही मस्साजोगला जाऊन या कुटुंबीयांना देणार आहोत. देशमुख यांच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. प्रत्येकाने त्यांचं कुटुंब हे आपलं कुटुंब आहे, असं समजलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांना शक्य तेवढी मदत केली पाहिजे, असं सोळंके यांनी म्हटलं आहे.