वर्धा : एका प्राध्यापकचा मुलगा जो एकदम साधासुधा राहायचा, मात्र अचानकच त्याचे राहणीमान बदलले आणि लहपणापासून पाहणाऱ्या परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. आरोग्य विभागासह विविध परिक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यात मुख्यसुत्रधार असलेला डॉ. प्रीतीश देशमुख हा मूळचा वर्ध्याचा असल्याने त्याबाबतीत विविध चर्चा रंगू लागल्या आहे. प्रीतीश याला आलिशान गाड्यांसह 9 नंबरचा मोह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डॉ. प्रीतीश याने पुण्यासह वर्धा आणि लगतच्या परिसरात चांगलीच माया जमविल्याची खमंग चर्चा आता शहरात सुरु आहे. या घोटाळ्याकडे राज्यभरासह आता वर्धा शहराचे लक्ष लागले आहे.
प्रीतीशच्या वर्गमित्राने केला खुलासा
डॉ. प्रीतीश दिलीप देशमुख याचे प्रायमरी शिक्षण वर्धा येथे झाले. त्यानंतर त्याने वैद्यकीय शिक्षण नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करण्यासाठी देखील त्याला अडचणी आल्या. मात्र, त्याने कसेबसे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले. मात्र, अभ्यासात त्याला फारशी रुची नव्हती, अशी माहिती त्याच्या वर्गमित्रांनी सांगितली. त्यानंतर तो पुण्याला गेला. तेथे त्याने मंत्रालयातून सेटिंग लावून विविध टेंडर मिळविले. अल्पावधीतच त्याने कोटी रुपयांची माया जमा केली आणि तो कोट्यधीश बनला. अशी माहिती त्याच्या वर्गमित्राने दिली आहे. मात्र त्याच्या आलिशान निवासस्थानालगतच्या रहिवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला. विविध परिक्षांच्या घोटाळा प्रकरणांत तो सापडला आणि त्याच्याकडील खजिन्याचा पेटाराच फुटला.
आलिशान निवासस्थानासह आलिशान गाड्यांचाही मोह
डॉ. प्रीतीश याला आलिशान निवासस्थानासह आलिशान गाड्यांचाही मोह होता. त्याने 24 ऑक्टोबर 2018 ला एक आलिशान गाडी घेतली. त्यानंतर त्याने 28 एप्रिल 2021 रोजी देखील महागडी मर्सिडीज आलिशान गाडी घेतल्याची नोंद आरटीओमध्ये आहे. इतकेच नव्हेतर त्याने विविध ठिकाणी कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहितीही आता पुढे येऊ लागली आहे. प्रीतीशला आलिशान गाड्यांचा मोह होता. त्याला 0009 या व्हीआयपी क्रमांकाचे वेड होते. त्याने 2018 मध्ये घेतलेल्या गाडीसाठी एम.एच. 32 एएच 0009 हा क्रमांक मिळवला. 28 एप्रिलला घेतलेल्या आलिशान मर्सिडीज गाडीकरिता एम.एच. 32 एएस.0009 हा क्रमांक मिळवला. हे व्हिआयपी क्रमांक मिळविण्यासाठी आवश्यक रक्कम मोजल्याचीही माहिती पुढे आली आहे. एवढंच नव्हे तर त्याच्याकडे विविध ठिकाणी पाच ते सहा ‘लक्झरिअस’ गाड्या असून सर्वांचे नंबर हे 9 असल्याची माहिती आहे.
मंत्रालयातील ओळख सांगून अनेकांना गंडा
माझी मंत्रालयात ओळख आहे, तुमचे काम करुन देतो, नोकरी लावून देतो, असे म्हणत डॉ. प्रीतीश देशमुख याने वर्धेतील अनेकांना गंडविल्याची माहितीही आता पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी वर्ध्यात जाऊन चौकशी केल्यास आणखी काही गुपीतं उघडण्याची शक्यता आहे.