‘पेडणेकर बाईंना पोलिसांनी का ताब्यात घेतलं नाही’; दिशा सालियन प्रकरणात नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

| Updated on: Mar 22, 2025 | 5:06 PM

दिशा सालियन प्रकरणात आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

पेडणेकर बाईंना पोलिसांनी का ताब्यात घेतलं नाही; दिशा सालियन प्रकरणात नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. आज भाजप नेते नारायण राणे यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेत काही सवाल उपस्थित केले आहेत.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे? 

सतीश सालियन यांच्यावर दबाव होता. घरी पेडणेकर ताई जायच्या. आणि इतर लोक जायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. ते दु;खात होते. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हता. डॉक्टर बदलले गेले. रुग्णवाहिका बदलली. तीथे जो काही प्रकार झाला तो प्रकरण दडपण्यासाठी झाला. म्हणून दबाव कमी झाल्यावर तिच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली. ते सरकारकडे नाही तर कोर्टात गेले, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, एखाद्या महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाला असेल तर पोलिसांनी त्वरीत एफआयआर दाखल करून चौकशी करावी, आरोपीला अटक करावी असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. हा कायदा तेव्हाही होता. माझ्याकडे कॉपी आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई का केली नाही? वाझे ताब्यात आहे. चार फटके दिले तर सर्व कळेल. या सर्वांचा कर्ताकरविता वाझे आहे. तीच्या वडिलांवर दबाव होता असं राणे यांनी म्हटलं आहे.

हे घाणेरडे कृत्य आहे. ही मर्दानगी नाही. चारपाच लोकांनी एका मुलीला धरायचं आणि तिच्यावर अत्याचार करायचा. तुम्ही सर्वांनी पेटून उठलं पाहिजे. जगात मुंबई पोलिसांचं नाव आहे. पण ते अजून का थांबले याचं आश्चर्य वाटतं. यातील सत्य सर्वांना माहीत आहे. का नाही पेडणेकर बाईंना पोलीस ताब्यात घेत, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. दिशाच्या आईवडिलांवर का दडपण आणलं गेलं? असा सवालही यावेळी राणे यांनी केला आहे.