राजकारण म्हटलं की राजकीय हेवेदावे, पदांसाठी सुरु असलेली रस्सीखेच अन् कुरघोड्या असंच काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. या सगळ्यात मैत्री अन् जिव्हाळ्याची नाती फार कमी पाहायला मिळतात. पण काही राजकीय नेते आपली मैत्री मनापासून निभावताना दिसतात. असंच काहीसं नातं आहे प्रितम मुंडे आणि रक्षा खडसे यांचं…. या दोघी घट्ट मैत्रिणी आहेत. संसदेत दोघींनी 10 वर्षे एकत्र काम केलंय. रक्षा खडसे सध्या केंद्रात मंत्री झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट प्रितम मुंडे यांनी शेअर केली. यात प्रितम मुंडे यांनी आठवणींना उजाळा दिलाय.
रक्षा खडसे या मंत्री झाल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी मुलाखती दिल्या. यावेळी एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, प्रितम मुंडे संसदेत सोबत नसतील म्हणून मला रडू आलं. त्यांचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यानंतर प्रितम मुंडे यांनी देखील पोस्ट शेअर करत रक्षा खडसेंना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रितम मुंडे यांनी यंदा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे त्या संसदेत जाऊ शकणार नाहीत. पण जिवाभावाची मैत्रिण रक्षा खडसे केंद्रात मंत्री होताच प्रितम यांनी भावनिक पोस्ट शेअर केलीय. आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे, असं प्रितम मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
10 वर्ष ही खूप काही देऊन गेली , बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू ! रक्षा ;आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे.. पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणाऱ्या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळताना देखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या. १० वर्ष सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या, पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या, दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या, एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण . संसदेतली विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण, अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो!
१० वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच सोबतीने खूप छान झाला, पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील. आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडो, सतत लोकसेवा तुझ्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना