लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीने जवळपास सर्वच जागांची यादी घोषित केली आहे. यातील काही जागा अजूनही रखडलेल्या आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे. साताऱ्यातून लढण्यास महायुतीकडून उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. पण भाजपने अजूनही त्यांचं नाव घोषित केलेलं नाही. उदयनराजे यांनी शक्तिप्रदर्शन करूनही त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी कुणाला उमेदवारी द्यायची याचा शोध शरद पवार घेत आहेत. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी साताऱ्याचा दौरा करूनही कुणाचंच नाव फिक्स झालेलं नाही. मात्र, साताऱ्यातून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण उभे राहणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. पृथ्वीबाबांनीही शरद पवार यांनी सांगितल्यास आपण लढण्यास तयार असल्याचं स्पष्ट करून राजकीय धुरळा उडवून दिला आहे.
साताऱ्यातून माझ्या नावाची चर्चा सुरू नाही. कारण ही जागा शरद पवार गटाची आहे. मीडियाने माझं नाव घेतलं आहे. शरद पवार यांनी आदेश दिला तर मी लढायला तयार आहे. हा निर्णय शरद पवार यांचा आहे. मला खात्री आहे की, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत जातीयवादी विचार येणार नाही, त्यासाठी शरद पवार आणि आम्ही कटिब्ध आहोत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.
साताऱ्यातून काँग्रेस उमेदवार देणार नाही. हा प्रश्न स्थानिक आहे. याचा निर्णय शरद पवार यांनी घ्यायचा आहे. सर्वात सक्षम उमेदवार कोण आहे हे शरद पवार ठरवतील. त्यात जो काही निर्णय होईल तो सर्वमान्य होईल. साताऱ्याबाबतचीही चर्चा सुरू आहे. जयंत पाटील काल मला भेटले. हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे आहे. इथला उमेदवार त्यांनी ठरवायचा आहे. ते जो उमेदवार देतील त्याच्यासाठी ताकदीने काम करायची आमची तयारी आहे. जातीयवादी पक्ष या मतदारसंघात येणार नाही यासाठी शरद पवार सांगतील ते काम करायला आम्ही तयार आहोत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
महाविकास आघाडी 48 जागा लढणार आहे. यापैकी 45 जागा निश्चित झाल्या आहेत. दोन तीन जागा कुणी लढायच्या यावर चर्चा सुरू आहे. त्यावर दिल्लीचे आमचे वरिष्ठ, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते निर्णय घेतील. कोण उमेदवार असावा ही दुसऱ्या टप्प्याची चर्चा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजपला या निवडणुकीत फायदा होणार का? या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 2019ला बालाकोटमुळे राष्ट्रभक्तीच्या नावाने 6-7 टक्के मते मिळाली. राम मंदिरामुळे त्यांना मते वाढेल असं वाटत होतं. पण ते होणार नाही. राम मंदिर हा दोन ट्रस्टचा वाद होता. तो वाद मिटला. मंदिर उभं राहिलं. त्यात मोदींचा काय संबंध आहे? हा खासगी विषय आहे. त्यांना वाटलं प्राणप्रतिष्ठा करायला बोलावलं म्हणून सर्व मते मिळतील. पण तसं होणार नाही, असंही ते म्हणाले.
भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते 400 पार का म्हणत आहेत? 370 आकड्यात काय जादू आहे? जर 543 सदस्यांच्या संसदेत जर घटना बदलायची असेल तर दोन तृतियांश बहुमत पाहिजे. दोन तृतियांश बहुमतासाठी 360 असा आकडा आहे. म्हणजे 370 आकडा म्हणून त्यांनी घेतला. मुद्दाम त्यांनी हा आकडा घेतला आहे. त्यांचे खासदार हेगडे म्हणाले की, बहुमत मिळालं तर आम्ही घटना बदलू. त्यामुळे ही निवडणूकच घटना बदलायसाठी आहे. आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलायची आणि मनुस्मृती आणायची आहे. त्यासाठी इलेक्शन होत आहे. लोकांनी हे इलेक्शन हाती घेतलं आहे. मला वाटतं भाजप 250 जागाही पार करणार नाही. 400 पार तर कुठल्या कुठे राहिलं, असंही त्यांनी सांगितलं.