मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला नव्हता. वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात यावा अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून सुरू होती. अखेर आज वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर परळीमधील त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
वाल्मिक कराडवर आज मकोका लावण्यात आला, त्यानंतर त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज सकाळपासूनच वाल्मिक कराड याचे समर्थक त्याच्या समर्थनासाठी रस्त्य्यावर उतरले होते. पाण्याच्या टाकीवर चाढून आंदोलन सुरू होतं. याचदरम्यान एकाला भोवळ आल्याची देखील घटना घडली, वाल्मिक कराडची आई देखील या आंदोलनात सहभागी झाली होती. मात्र आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे.
वाल्मिक कराड याची सीआयडी कोठडी संपल्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र त्यानंतर लगेचच त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याचा ताबा घेण्याची परवानगी कोर्टानं एसआयटीला दिली आहे. उद्या त्याला हत्येच्या प्रकरणात केज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
दम्यान वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याची बातमी समोर येताच त्याचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. परळी बंदची हाक देण्यात आली आहे. परळीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. टायर जाळून आंदोलन करण्यात आलं. तसेच यावेळी आंदोलकांकडून बसवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे आता परळीचं वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.
उद्या कोर्टात हजर करणार
वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर आता त्याचा ताबा घेण्याची परवानगी कोर्टानं एसआयटीला दिली आहे. त्याला उद्या केज कोर्टात हजर केलं जाणार आहे. कोर्ट या प्रकरणात काय निर्णय देणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.