होळीसाठी कोकणात एसटीच्या 250 जादा बसेसची सोय

| Updated on: Feb 07, 2023 | 7:12 PM

कोकणात होळीसाठी जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अडीचशे जादा बसेसची सोय केली आहे.सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

होळीसाठी कोकणात एसटीच्या 250 जादा बसेसची सोय
MSRTC (1)
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई :  होळीनिमित्त कोकणात ( KONKAN ) जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने ( MSRTC ) नियमित बसेस शिवाय 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा गाड्या 3 ते 12 मार्च दरम्यान  कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. होळीचा सण कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असतो, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महामंडळाने ही सोय केली आहे.

गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा 250  जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या गर्तेत सापडली आहे. एसटीने गणपती सणाच्या हंगामातही कोकणासह इतर भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी दोन हजाराहून अधिक जादा गाड्या सोडल्या होत्या. परंतू तरीही यापासून एसटीच्या तिजोरीत फारशी भर पडली नाही. आता होळीचा हंगाम तरी एसटी महामंडळाला फळणार का ? असा सवाल केला जात आहे.

येथून सुटणार जादा गाड्या 

कोकणात होळीच्या सणासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून अडीचशे गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात एसटीचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल आगार, परळ आगार, कुर्ला आगार , बोरिवली , ठाणे , वसई आगार , नालासोपारा आगार तसेच पनवेल आगारातून कोकणातील  खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

ऑनलाईन आरक्षणाचीही सोय

कोकणात होळीसाठी जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांनी जादा बसेसच्या आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच Msrtc Mobile Reservation App याचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.