मुंबई : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर संसद भवनातून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. मात्र कालच सूरत सत्र न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना तब्बल दोन वर्षांची शिक्षा सुनावली त्यावेळी यामागे दुसरचं षडयंत्र आहे, असे संकेत मिळाले होते, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. राहुल गांधींवरील कारवाईचे वृत्त आल्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. काल झालेल्या शिक्षेनंतरच सरकारच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, याचा अंदाज आला होता, असं चव्हाण म्हणाले.
सूरत कोर्टाने साध्या मानहानीच्या खटल्यात 2 वर्षाची शिक्ष सुनावली. तर एखाद्या संसद सदस्याची खासदारकी रद्द करण्यासाठी त्याला 2 वर्षांची शिक्षा होणं आवश्यक असतं. त्यामुळे ही शिक्षा सुनावण्यात आली, त्याच वेळेला सरकारच्या डोक्यात काय सुरु होतं, याचा अंदाज आम्हाला आला होता, असं वक्तव्य चव्हाण यांनी केलंय.
तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीदेखील या कारवाईवरून संताप व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘ संविधानाच्या रक्षणासाठी लढणाऱ्यांचं तोंड बंद करण्यासाठी त्यांना संसदेच्या बाहेर काढण्यात आलं. मानहानी केसमध्ये ज्या व्यक्तीचा काहीही संबंध नाही, बॅकवर्ड-फॉरवर्ड क्लासचा संबंध नाही. अशांनी तक्रार केली.
नीरव मोदी, ललित मोदी हे बॅकवर्ड क्लासचे होते का? राहुलजी देशासमोर सत्य सांगत होते. ते पटत नव्हते. राहुलजींना संसदेतून बाहेर काढण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप मल्लिकार्जून खर्गे यांनी केलाय.
राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना एक वक्तव्य केलं होतं. यात नरेंद्र मोदी यांची तुलना नीरव मोदी, ललित मोदी यांच्याशी केली होती. सर्व चोरांची आडनावे मोदी कशी असतात, असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. याच वक्तव्यावरून गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेतला होता. मोदी समुदायाचा हा अपमान असल्याचं सांगत त्यांनी सूरत कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात राहुल गांधी यांना काल सूरत कोर्टाने २ वर्षांची शिक्षा सुनावली. आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.