दिनकर थोरात, सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भूमिकांवर संशय असतानाच आज राज्यात आणखीच चर्चांना उधाण आलंय. या चर्चांचं कारण म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट. अदानी यांनी सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा चालली. या भेटीत नेमकं काय घडलं असेल, भेटीमागचं नेमकं कारण काय असेल यावरून मुंबई ते दिल्ली चर्चांना उधाण आलंय. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर आक्रमक पवित्रा घेतला असतानाच शरद पवारांनी गौतम अदानींची भेट घेणं, यावरून राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरून स्पष्टीकरण दिलं…
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीमागे नेमकं काय कारण असावं, याची चाचपणी सुरु आहे. यावरून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवार आणि गौतम अदानी यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. कुणी कुणाला भेटावं याबाबत मी बोलणं योग्य नाही. आमचे अदानींबद्दलचे प्रश्न कायम आहेत. पंतप्रधानांवर आरोप आम्ही केलेत आणि त्याची उत्तर त्यांनीच द्यावी, अशी आमची अपेक्षा आहे.. ज्याच्यावर गंभीर आरोप आहे, त्या आरोपातून बाहेर पडण्याकरिता तो प्रयत्न करतच असतो. जो अडकलेला असतो, तो कुठून तरी मदत मिळेल का, याचा प्रयत्न करत असतो. यासाठीच अदानी शरद पवार यांना भेटले असावेत, अशी शक्यता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
गौतम अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केलाय. तर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनीदेखील यावरून सवाल उपस्थित केलाय. पृथ्वीराज व्हाण म्हणाले, ‘ कंपन्या विकून पैसे आणले आहेत, असे आदानी सांगतो मग तू बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून मॉरिशसमध्ये का पैसे गुंतवले भारतात का गुंतवले नाही, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. पंतप्रधानांना आम्ही काही प्रश्न विचारले आहेत. आरोप त्यांच्यावर आलेत. केजरीवाल, राहुल गांधींनी आरोप केलेत. त्यांना मोदींनी उत्तर द्यायला हवं.. पवार किंवा अदानी देऊ शकणार नाहीत. कोण-कुणाला भेटलं, याचं आम्हाला काही देण-घेणं नाही. जनता बघतेय.
गौतम अदानी प्रकरणात शरद पवार यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. ज्या हिंडेनबर्ग अहवालातून अदानींवर आरोप करण्यात आलेत, त्यावरूनच शरद पवार यांनी साशंकता व्यक्त केली आहे. देशातील विरोधी पक्षांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेमके काय संबंध आहेत, यावरून जेपीसीद्वारे चौकशीची केली. मात्र अदानी प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशी करण्याची गरज नाही. निवृत्त न्यायाधीशांमार्फतच चौकशी करावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. पवार यांच्या या भूमिकेनंतरही काँग्रेसने जेपीसीची मागणी लावून धरली होती. त्यानंतर अदानी आणि पवार यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.