प्रदिप कापसे, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, पुणे | 25 नोव्हेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे युती सरकारमध्ये सामील झाले खरे पण ते नाराज आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अजित पवार यांनी अमित शाह यांना भेटून याविषयी तक्रार केली असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशात आज पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना या विषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. मी अमित शाह यांच्याकडे तक्रार केली नाही, असं अजित पवार म्हणालेत.
पीक विमा कंपन्यांनी लवकर पैसे द्यावेत यासाठी अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत. लवकरात लवकर अपील करावं, यासाठी त्यांनी सूचना दिल्या आहेत. प्रधानमंत्री खरीप विमा योजेनेतील पैसे लवकरात लवकर मिळतील, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असंही अजित पवार म्हणाले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.
अलीकडच्या काळात महाराष्ट्रात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण त्या अधिकाराचा वापर आपण कशाप्रकारे करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. आज समाजात वेगवेगळे प्रश्न आहेत. पण रोज कोणीतरी काहीतरी विधान करत आहेत. कोणी आरे म्हटलं तर दुसरा लगेच का रे म्हणतो. ही शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे सगळयांनी लक्षात ठेवावे. मी कोणत्या पक्षाचा उल्लेख केला नाही, मी दोन्ही बाजू म्हटल्यानंतर सगळेच आले, त्यात आम्ही लोक देखील आलो. कोण एकाला बोलायची गरज नाही, तर माझ्यासह सर्वांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
राज्यात सध्या जाती-जातींमध्ये तेढ निर्माण झालेला दिसतो. त्यावर अजित पवार यांनी भाष्य केलंय. आपल्या महाराष्ट्रात इतर अनेक प्रश्न आहेत. प्रत्येकाला आपल्या समाजासाठी आरक्षण मागण्याचा अधिकार आहे त्याबद्दल कोणाचे दुमत नाही.पण आरक्षण देत असताना ते कायद्याच्या चौकटी टिकलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही लोकांनी आरक्षण दिलं होतं, पण दुर्दैवाने ते हायकोर्टात टिकले नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यामुळे त्या घटकाला राज्यकर्ते समाजाला खेळवत आहेत का असं वाटतंय? प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण ती भूमिका मांडत असताना त्यातून कटुता येऊ नये. एकमेकांबद्दल कटुता निर्माण होऊ नये. याबद्दलची काळजी सर्वांनीच घ्यावी, असंही अजित पवार म्हणाले.