प्रदिप कापसे, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, पुणे | 25 नोव्हेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना डेंग्यू झाला होता. त्यामुळे ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नव्हते. मात्र आजारपणातून बरं होताच अजित पवार हे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. अजित पवार हे सध्या पुण्यात आहेत. त्यांनी पुण्यातील शिक्षक भवनमध्ये सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली. बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. अजित पवार यांनी प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत. सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण करा. पुढे आता लोकसभा निवडणूका लागतील. आचारसंहिता लागेल तेव्हा कामं मंदावतील. परत विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या तडाख्यात निधी देता येणार नाही. त्यामुळे आज मी वेळ काढून काम पाहायला आलो आहे. लवकरात लवकर ही कामं पूर्ण करा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सध्या शाब्दिक चकमक पाहायला मिळतेय. यात अजित पवारांनी लक्ष घालावं आणि छगन भुजबळ यांना समज द्यावी, असं मनोज जरांगे पाटील वारंवार म्हणतात. त्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं. प्रत्येकाची नाव घेऊन कोट करून मी बोलत नाही. पण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वांनीच भूमिका नीटपणे समजून घेऊन कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं अजित पवार म्हणाले.
यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृती दिन आहे. त्यानिमित्त अजित पवार यांनी प्रीतीसंगम या चव्हाण यांच्या समाधीस्थळी जात अभिवादन केलं. सुसंकृत महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी यांनी यांच्यामध्ये व्यवस्थित एकोपा करून एकमेकांचा आदर करून समाजकारण आणि राजकारण कसं करायचं असतं, याची मुहूर्तमेढ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी रोवली, असं म्हणत अजित पवार यांनी आदरांजली अर्पण केली.