पुणे : पुण्यातील भाजप आमदाराची एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अतिशय अर्वाच्य भाषेत भाजप आमदार महिला अधिकाऱ्याला बोलत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून ऐकायला मिळतंय. ही ऑडिओ क्लिप राज्याच्या माजी सामाजिक न्यायमंत्र्यांच्या आमदार भावाची असल्याचं अनेक जण म्हणत आहेत.
पुणे महापालिकेतील कामाच्या लॉकिंग बिलासंदर्भात आमदारांनी महिला अधिकाऱ्याला फोन केला. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असं म्हणत महिला अधिकाऱ्याला आमदारांनी धमकाविण्याचा प्रयत्न करत अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली.
“किती वेळा त्याने तुमच्याकडे यायचं, काम होणार आहे की नाही, नसेल तर तसं सांगा, मी बघतो मग काय करायचं?”, असं आमदार तावातावाने अधिकाऱ्याला म्हणत आहे. त्यावर महिला अधिकारी तुम्ही आमच्या साहेबांना फोन करा, असं सांगतात. त्यावर मी काय तुमचा नोकर आहे का?, तुम्ही तुमच्या साहेबाला फोन करा, आणि मला परत 10 मिनिटांत फोन करा, असं आमदार म्हणतात.
पुण्यातील अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर ही ऑडिओ क्लिप अतिशय वेगाने व्हायरल होतीय. अनेक जण ही ऑडिओ क्लिप ऐकून संताप व्यक्त करतायत. मात्र जरी ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असली तरी टीव्ही 9 या क्लिपची पुष्टी करत नाहीय.
एकंदरितच ही ऑडिओ अतिशय गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेतली आहे. एका लोकप्रतिनिधीला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. महिला अधिकाऱ्याशी अशा प्रकारे बोलणं निश्चित शोभणार नाही. महिलांचा सन्मान करा असं सांगणारे भाजपा नेते आता संबंधित आमदारावर कारवाई करणार का?, हे पाहणे महत्त्वाचं आहे.
(टीव्ही 9 या क्लिपची पुष्टी करत नाहीय…)
हे ही वाचा :