अभिजीत पोते, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, पुणे : पुण्यातील बहुचर्चित असलेला चांदणी चौक (Chandani Chowk) पाडण्याची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे. पुणे (Pune) जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. 01 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता पूल (bridge) पाडण्यास सुरुवात होणार आहे. ते काम 2 ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. रात्री दोन वाजता विस्फोट करुन हा पूल जमीनदोस्त केला जाणार आहे. 01 ऑक्टोबरला रात्री 11 वाजताच महामार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारा पुण्यातील चांदणी चौक पाडण्याचा अखेर मुहूर्त ठरला आहे.
पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यावेळी माहिती देत असतांना मध्यरात्री दोन वाजता ब्लास्ट करण्याकरिता चारशे मीटर अंतराच्या मध्ये चार व्यक्ती असणार असल्याचे म्हंटले आहे.
याशिवाय यामधील 03 व्यक्ती ह्या ब्लास्ट करणाऱ्या कंपनीचे अधिकारी असणार असून याशिवाय 02 शहरातील पोलीस अधिकारी असणार आहे.
पूल पाडण्याच्या प्रक्रियेदरम्यान दोनशे मीटर अंतरावर कोणालाही उपस्थित राहता येणार नाहीये. याबाबतची सर्व जबाबदारी ही पुणे पोलीसांची असणार आहे.
ब्लास्ट झाल्यानंतर जवळपास 15 मिनिटे ही धूर बसण्यासाठीचा वेळ लागेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यानंतर ब्लास्ट शिल्लक राहिला आहे का याची खात्री केली जाणार आहे.
यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 02 ऑक्टोबरच्या सकाळी 08 वाजे पर्यन्त सर्व पाडकाम केलेले साहित्य हटवण्याचा प्रयत्न असणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त अद्यावत उपकरणांचा वापर होणार आहे.
साताऱ्याला जाणाऱ्या नागरिकांनी सिंहगड रोड, कोथरुड, वारजे या मार्गाचा वापर करण्यास पोलीसांनी आवाहन केले आहे. तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहन धारकांनी या वेळेत वडगाव नवले पूलाचा वापर करून शहरात यावे लागेल.
त्यानंतर शहरात प्रवेश केल्यानंतर पाषाण किंवा बाणेर मार्गे महामार्गाला जाण्यासाठी पर्याय ठेवला आहे तर साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहन
धारकांनी वाकड ते बाणेर मार्गे पुणे शहरात प्रवेश करून वडगाव नवले किंवा कात्रज चौकातून महामार्गाकडे जाण्याची व्यवस्था असणार आहे.
या प्रक्रियेदरम्यान पोलीस प्रशासनावर मोठी जबाबदारी असणार असून वाहतूक खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.