…तर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार; पृथ्वीराज चव्हाण यांचा सर्वात मोठा दावा

| Updated on: Jan 10, 2024 | 11:47 AM

Prithviraj Chavan on hivsena MLA Disqualification Case Final Hearing : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार?; पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने चर्चांना उधाण. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. राजकीय वर्तुळात भूकंप होण्याचा दावा त्यांनी केलाय.

...तर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार; पृथ्वीराज चव्हाण यांचा सर्वात मोठा दावा
Follow us on

योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी,  पुणे | 10 जानेवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. पक्षांतर कायदा बदलायला हवा आणि याचे राजकीय परिणाम वाईट आहेत. 16 आमदार जर अपात्र झाले आणि त्यांचं पद गेलं तर राजकीय भूकंप होईल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पक्षांतर बंदी कायद्यात बदल हवा”

पक्षांतर कायदा बदलायला हवा आणि याचे राजकीय परिणाम वाईट आहेत. 16 आमदार जर अपात्र झाले. शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचं पद गेलं तर राजकीय भूकंप होईल. घटनात्मक तरतूद काय आहे हे पाहायला हवं. आजचा निकाल हा अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय असेल. घटनात्मक पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा 1985 साली आला. या कायद्याचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. या कायद्याला बदलायला हवं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

आमदार अपात्रतेच्या निकालावर चव्हाण म्हणाले…

16 आमदारांना रद्द केलं पाहिजे ही कायदेशीर बाब झाली. पण विधानसभा अध्यक्ष कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असतात आणि ते त्या पक्षाचे हित बघणार नाहीत, असं होणार नाही. या निकालाला दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. आज 4 वाजता काय निर्णय होईल हे पाहावं लागेल, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

नार्वेकर- एकनाथ शिंदे भेटीवर प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलेले. मी कधी याआधी पाहायला मिळालं नव्हतं. चुकीचा पायंडा पाडला गेला आहे. विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री यांना भेटायला जाणे हे चुकीची बाब आहे. जर निकाल वेगळा आला तर आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागू, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपकडून वारंवार विजयाचा दावा केला जातो. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपवाले 45 पार जागांवर विजय मिळेल म्हणतात. पण 48 पार जिंकू असं का म्हणत नाहीत?, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.